अमरावती, 27 मार्च (हिं.स.)।
हमीभावाने खरेदीसाठी आवश्यक नोंदणीला आता १५ दिवसांची मुदतवाढ देण्यात आली जिल्ह्यातील २१ केंद्रांवर ९ एप्रिलपर्यंत नोंदणी होईल. त्या तुलनेत खरेदी मात्र १४ केंद्रांवरच होत असल्याने अडचणीतील शेतकऱ्यांना मार्केटमध्ये तुरीची बेभाव विक्री करावी लागत असल्याचे वास्तव आहे.
हंगामात शेतमालाचे भाव पडतात, त्यामुळे शासनाद्वारा शेतमाल खरेदी करून शेतकऱ्यांना हमीभावाचे संरक्षण दिल्या जाते. या प्रक्रियेत तुरीची ऑनलाइन नोंदणी २४ जानेवारीपासून करण्यात आली. त्यानंतर मुदत २४ फेब्रुवारीला संपल्याने ३० दिवसांची मुदतवाढ देण्यात आली व या अवधीतही शेतकऱ्यांची नोंदणी बाकी असल्याने मुदतवाढीची मागणी शासनाकडे करण्यात आली होती.
नऊ केंद्रांवर अद्याप खरेदी नाही
‘व्हीसीएमएफ’च्या अमरावती, चांदूरबाजार, अंजनगाव सुर्जी, येवदा, कापूसतळणी, भातकुली तसेच ‘डीएमओ’च्या धारणी, खल्लार व नेरपिंगळाई केंद्रांवर आतापर्यंत तुरीची खरेदी करण्यात आली. मात्र, खरेदी सुरू नसल्याने शेतकरी अडचणीत आले आहे. या शेतकऱ्यांनी तूर विक्रीसाठी कुठे जावे, हा प्रश्न निर्माण झाला आहे.