वॉशिंगटन, 18 मार्च (हिं.स.)।अमेरिकन विमान कॅरेबियन किनारपट्टीवर कोसळून सात जणांचा मृत्यू झालाय. यात एका प्रसिद्ध संगीतकाराचाही सावेश आहे. तर दहा जणांना वाचवण्यात आलं असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, सोमवारी(दि. १७) रात्री होंडुरास इथं ही दुर्घटना घडली. हे जेटस्ट्री विमान होंडुरासच्या एअऱलाइन लान्साचं होतं. विमानातून १४ प्रवासी आणि ३ क्रू मेंबर प्रवास करत होते. होंडुरासच्या रोआतान बेटावरून उड्डाण केल्यानंतर काही मिनिटातच विमान समुद्रात कोसळलं. यात सात जण मृत्यूमुखी पडले तर दहा जणांना वाचवण्यात आलंय. प्रवाशांमध्ये एक अमेरिकन नागरीक, एक फ्रेंच नागरीक आणि दोन अल्पवयीन होते.
रोआतन फायर कॅप्टन फ्रँकलीन बोरजास यांनी सात जणांचा मृत्यू झाल्याचं सांगितलंय. प्रसिद्ध संगीतकार ऑरेलियो मार्टिनेस सुवाजो याचाही या दुर्घटनेत मृत्यू झाला.या दुर्घटनाग्रस्त विमानाचे काही अवशेष किनारपट्टीपासून एक किमी अंतरावर आढळले. मंत्री रेने पिनेडा यांनी याबाबत माहिती दिली.या प्रकरणी होंडुरास नॅशनल पोलिसांनी फुटेज जारी केलं असून त्यात अधिकारी आणि बचाव पथक बचावकार्य करताना दिसतंय. यात जखमी लोकांना किनारपट्टीवर आणलं जाताना दिसत आहे. रात्रभर बचावकार्य राबवण्यात आले.