“2 लाखांत सुटला गुटख्याचा ट्रक? मुक्ताईनगरात चिघळले तस्करी प्रकरण, राजकीय पाठबळावर खुलेआम तस्करी!”
मुक्ताईनगर परिसरात मध्य प्रदेश व महाराष्ट्राच्या सीमेवरील असलेल्या स्थितीचा गैरफायदा घेत, अवैध गुटखा तस्करी बिनधास्त सुरू आहे. या तस्करीमागे राजकीय पाठबळ, पोलिस आणि अन्न व औषध प्रशासनाचा अर्थपूर्ण हात असल्याचे आरोप उघडपणे होऊ लागले आहेत. नुकत्याच घडलेल्या घटनेने तर या सगळ्या साखळीला अधिकच बळकटी दिली असून, स्थानिक नागरिकांमध्ये संतापाचा सूर उसळला आहे.
ठळक मुद्दे:
- सीमावर्ती मुक्ताईनगरचा गैरफायदा घेत गुटख्याची मोठ्या प्रमाणावर तस्करी सुरू
- जळगावातील कथित मोठ्या तस्करांचा सहभाग; दिवसाढवळ्या ट्रकच्या ट्रक भरून तस्करी
- राजकीय व प्रशासकीय आशीर्वादामुळे तस्कर निर्भीडपणे कारभार करत असल्याचा आरोप
- ट्रक पकडूनही तोडीपाणी करून केवळ 2 लाखात सोडल्याची माहिती
- राजकीय पदाधिकारी आणि पोलिस कर्मचारी यांची संदिग्ध भूमिका; नागरिकांमध्ये तीव्र संताप
- शहरात अपघात, पाठलाग, आणि आर्थिक साटेलोटींमुळे चर्चेचा भडका
सविस्तर बातमी:
मुक्ताईनगर हे ठिकाण महाराष्ट्र व मध्य प्रदेशाच्या सीमेवर असल्याने, या मार्गावरून मध्य प्रदेशातून महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेल्या विमल, तानसेन, राजश्रीसारख्या गुटखा व पानमसाल्याची तस्करी सातत्याने होत असते. यापूर्वीही याच मार्गावरून कोट्यवधी रुपयांच्या गुटख्याची जप्ती करून पोलिस व अन्न व औषध प्रशासनाने कारवाई केली आहे.
तथापि, या कारवाया फक्त उघड दिसणाऱ्या भागापुरत्या मर्यादित असल्याचे आता स्पष्ट होत आहे. कारण जळगाव जिल्ह्यातील एका बड्या कथित गुटखा तस्कराच्या मार्गदर्शनाखाली सर्रासपणे गुटखा ट्रकच्या ट्रक भरून दिवसाढवळ्या तस्कर केला जातो. यामध्ये संबंधित तस्कराला राजकीय पाठबळ असून, पोलीस आणि अन्न व औषध प्रशासनाशी देखील त्याचे हितसंबंध असल्याचे बोलले जाते.
दोन दिवसांपूर्वी याच तस्करीच्या संदर्भात एक धक्कादायक घटना घडली. एका राजकीय पक्षाचे दोन पदाधिकारी आणि त्यांच्यासोबत असलेला एक पोलिस कर्मचारी यांनी कोथळी (ता. मुक्ताईनगर) येथील उड्डाणपुलाखाली गुटख्याने भरलेला ट्रक पकडला. प्रारंभी ही कारवाई चांगली वाटली, मात्र नंतर गुटखा तस्कराशी झालेल्या ‘तोडीपाणी’च्या चर्चेनंतर केवळ 2 लाख रुपयांच्या मोबदल्यात ट्रक सोडण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
संबंधित रक्कम अवघ्या एका तासात संबंधित तस्कराच्या हाती पोहोचली, आणि ट्रक आपल्या मार्गाने निघून गेला. ही घटना सध्या मुक्ताईनगर शहरात चर्चेचा विषय बनली असून, सामान्य नागरिकांमध्ये तीव्र संताप आहे. “तस्करी थांबवण्यासाठी कोणीच जबाबदार नाही का?” असा सवाल आता जनतेकडून विचारला जात आहे.
विशेष म्हणजे, या घटनेदरम्यान गुटखा ट्रक थांबवण्यासाठी जीवघेणा पाठलाग देखील झाला, ज्यामुळे अपघाताची शक्यता वाढली होती. त्यामुळे केवळ तस्करीच नव्हे तर नागरिकांच्या जीवाशी खेळ होत असल्याची देखील चिंता व्यक्त केली जात आहे.
राजकीय वरदहस्त, प्रशासकीय हातमिळवणी आणि अवैध आर्थिक व्यवहार यांमुळे गुटखा तस्करीचा हा साखळीप्रकार अधिकच बळावत चालला आहे. यावर कठोर कारवाई झाली नाही, तर मुक्ताईनगर हे गुटख्याचे ‘हब’ होण्यास वेळ लागणार नाही. संबंधित यंत्रणांनी तत्काळ दखल घेऊन कारवाई करावी, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून होत आहे.
कोण आहेत ते दोघे राजकीय पदाधिकारी ? व कोणा आहे तो तोडीपाणीतील पोलिस कर्मचारी ?
जळगावच्या त्या बड्या गुटखा तस्कराकडून कोणा कोणाला हप्ते दिले जातात ?
व दिवसा ढवळ्या सुरू असलेल्या गुटखा तस्करीचा बंदोबस्त सरकारकडून होईल का ?
गृहमंत्री असलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या गंभीर प्रकरणाकडे लक्ष घालतील का ?
असे अनेक प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केले जात आहे.