जम्मू, 02 एप्रिल (हिं.स.) : जम्मू-काश्मीरमध्ये प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर (एलओसी) घुसखोरीच्या प्रयत्नात असलेल्या 4 ते 5 दहशतवाद्यांना भारतीय सैन्याने कंठस्नान घातले आहे. राज्यातील पूंछ भागतल्या कृष्णा घाटी सेक्टरच्या परिसरात मंगळवारी संध्याकाळी ही घटना घडली.
नियंत्रण रेषेला लागून असलेल्या भागात 3 सुरुंगांचे स्फोट झाले आणि पाकिस्तानकडून गोळीबार करण्यात आला. दहशतवाद्यांची भारतात घुसखोरी करवण्यासाठी पाकिस्तानकडून हा प्रकार करण्यात आला. परंतु, भारतीय सैन्याने त्याला जोरदार प्रत्युत्तर दिले. यामध्ये 4 ते 5 घुसखोर म मारले गेले. याबाबत भारतीय सैन्याने सांगितले की, 1 एप्रिल रोजी पाकिस्तानी सैन्याने नियंत्रण रेषेवरून घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला.
यामुळे कृष्णा घाटी सेक्टरमध्ये भूसुरुंगाचा स्फोट झाला. पाकिस्तानी सैन्याने कोणत्याही चिथावणीशिवाय गोळीबार केला आणि युद्धबंदीचे उल्लंघन केले. भारतीय सैनिकांनी या गोळीबाराला प्रत्युत्तर दिले. सध्या परिस्थिती नियंत्रणात आहे आणि त्यावर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे. नियंत्रण रेषेवर शांतता राखण्यासाठी 2021 चा डीजीएसएमओ करार कायम ठेवण्याची मागणी भारतीय लष्कराने केली आहे. दरम्यान, नेमके किती घुसखोर मारले गेले याबाबत सैन्याने कुठलीही अधिकृत माहिती दिलेली नाही.