नवी दिल्ली , 11 एप्रिल (हिं.स.)।26/11च्या हल्ल्याचा मास्टरमाइंड तहव्वूर राणा याला दिल्ली विमानतळावर अटक केल्यानंतर गुरुवारी(दि.१०) रात्री पटियाला हाऊस कोर्टात हजर करण्यात आलं. सुनावणी अंती कोर्टाने राणा याला 18 दिवसाची कोठडी मंजूर केली आहे.
तहव्वूर राणाला गुरुवारी(दि.१०)पटियाला हाऊस कोर्टात आणण्यात आलं. यावेळी एनआयएच्या वकिलाने राणाला 20 दिवसाची कोठडी देण्याची मागणी केली. राणाच्या कोठडीची कारणंही वकिलाने कोर्टासमोर मांडली. तसेच राणा हा आंतरराष्ट्रीय दहशतवादी असल्याने काही पुरावे आणि तथ्य मिळवण्यासाठी त्याची कोठडी हवी आहे, असा युक्तिवाद एनआयएकडून ज्येष्ठ वकील कृष्णन यांनी कोर्टात केला. कोर्टाने हा युक्तिवाद ग्राह्य धरून राणा याला 18 दिवसाची कोठडी दिली आहे.ही सुनावणी बंद खोलीत झाली. कोर्टात तहव्वूर राणा, लीगल सर्व्हिस ऑथॉरिटीने दिलेला त्याचा वकील आणि एनआयएच्या लीगल टीमसह जज आणि कोर्टाचा स्टाफ उपस्थित होता. कोर्टात सुनावणी सुरू असताना सुरक्षा रक्षकांचा कोर्टाबाहेर मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. सुरक्षा रक्षकांनी कोर्टाबाहेर रूट मार्च काढला. या परिसरात वाहनांना मज्जाव करण्यात आला होता.तसेच कोणत्याही व्यक्तीला आत सोडण्यात येत नव्हते.
विमानतळावर अटक करण्यात आल्यानंतर अडीच तासानंतर राणाला कोर्टात आणण्यात आलं. विमानतळावरच त्याची मेडिकल चेकअप करण्यात आली होती. कोर्टातून राणाला थेट एनआयएच्या मुख्यालयात नेण्यात येणार आहे. त्यामुळे एनआयएचं मुख्यालय सॅनिटाईज करण्यात आलं आहे. एनआयएच्या कार्यालयाबाहेर डॉग स्क्वॉडची टीम तैनात करण्यात आली आहे. मुख्यालयाबाहेरच्या प्रत्येक गोष्टीची तपासणी करण्यात येत आहे.
तहव्वूर राणा याच्या प्रत्यार्पण प्रकरणी अमेरिकेच्या न्याय विभागाचे प्रवक्ते निकोल नवास ऑक्समन म्हणाले की, प्रत्यार्पण 26/11 च्या पीडितांना न्याय देण्यासाठीचं महत्त्वाचं पाऊल आहे. अमेरिकेने दोषी दहशतवादी तहव्वूर राणाला भारतातील हल्ल्याप्रकरणी प्रत्यार्पित करण्यात आले आहे. त्याच्याशी संबंधित 10 गुन्हे भारताने दाखवले होते. दहशतवादी हल्ल्यात सहा अमेरिकन नागरिकांचा मृत्यू झाला होता. राणाचं प्रत्यार्पण म्हणजे त्या अमेरिकन नागरिकांना न्याय देण्यासाठी उचलण्यात आल्याचं हे पाऊल आहे.