संत मुक्ताई समाधी स्थळ (कोथळी) मंदिरासाठी 2.54 कोटी रु. निधी ची तरतूद
आ.चंद्रकांत पाटील यांच्या पाठपुराव्याला यश
मुंबई :
श्री. संत मुक्ताई मंदिर, कोथळी, ता. मुक्ताईनगर, जि. जळगाव या तीर्थक्षेत्राच्या विकास आराखडयांतील कामास २ कोटी ५४ लक्ष रू निधी वितरीत करणेबाबत महत्त्वाचा शासन निर्णय झाला असून मंदिराचे कामाला गती येणार आहे. यासाठी आमदार चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडे केलेल्या पाठपुराव्याला यश आलेले आहे.
“ग्रामीण तीर्थक्षेत्र विकास योजनेंतर्गत राज्यातील ग्रामीण तीर्थक्षेत्रांना निधी वितरीत करण्यासाठी सन २०२२-२३ या आर्थिक वर्षात एकूण रु.२२५००.०० लक्ष इतका निधी अर्थसंकल्पीत करण्यात आला आहे. सदर तरतुदीतून श्री संत मुक्ताई मंदिर, कोथळी, ता. मुक्ताईनगर, जि. जळगाव या तीर्थक्षेत्रातील विकास कामांसाठी उर्वरित रु.२,५३,६७,०००/- इतका निधी जिल्हाधिकारी, जळगाव यांना वितरीत करण्यात येत आहे”. असे शासन निर्णय क्रमांकः तिर्थवि-२०२१/प्र.क्र.१५७ (भाग-१)/ यो-६, दि. २३ मार्च, २०२३ मध्ये नमूद असून आमदार चंद्रकांत पाटील यांच्या प्रयत्नास यश आले असून वारकऱ्यांचे श्रद्धास्थान असलेले आदिशक्ती संत मुक्ताई मंदिराचे रखडलेले काम पूर्णत्वास जाण्याचा मार्ग मोकळा झाला असून मंदिराचे कामाला गती येणार आहे. निधी वितरित झाल्याची माहिती आमदार चंद्रकांत पाटील यांचे स्विय सहायक प्रवीण चौधरी यांनी दिली.