संत मुक्ताई पालखीचे उद्या शुक्रवारी पंढरपूरकडे प्रस्थान
मुक्ताईनगर : यंदा दोन वर्षाच्या खंडानंतर पालखी विठूरायाच्या भेटीला
मुक्ताई पालखी सोहळा पुस्तकाचे संत तुकाराम महाराजांचे वंशज बापूसाहेब मोरे महाराज यांच्या हस्ते होणार प्रकाशन
मुक्ताईनगर : कोरोना निर्बंधामुळे गेली दोन वर्षे संत मुक्ताई पायी आषाढीवारीत खंड पडला होता. यामुळें वारकऱ्यांचे डोळे पंढरपूर च्या विठ्ठलाच्या दर्शनासाठी आसुसलेले होते. यंदा दुग्ध शर्करा योग घडून आला असून आता निर्बंध हटले आहेत आणि पायी वारीचा मार्ग मोकळा झाला. संत मुक्ताई पालखी सोहळ्यात सहभागी होणाऱ्या खान्देशातील , विदर्भातील व मध्य प्रदेशातील वारकऱ्यांना दोन वर्षाच्या खंड नंतर पायी वारीचा परमोच्च आनंद घेता येणार असून संत मुक्ताईची आषाढी वारी पालखी शुक्रवार, ३ जून रोजी पंढरपूरकडे रवाना होणार आहे. ५ जुलै रोजी म्हणजेच आषाढी एकादशी च्या तीन दिवस आधीच हा सोहळा पंढरपूरमध्ये दाखल होईल.
पालख्यांमध्ये संत मुक्ताई पालखीचे अनन्य महत्त्व आहे.
राज्यात सर्वाधिक लांब अंतरावरून पायी येणारी ही एकमेव पालखी आहे. जवळपास ७०० किमी एका बाजूने प्रवास या पालखी सोहळ्याचा असतो. त्यामुळे इतर पालखी सोहळ्यांपेक्षा ही पालखी लवकर पंढरपूरकडे मार्गस्थ होत असते.
३३ दिवसांचा पायी प्रवास…
आषाढी वारीनिमित्त पंढरपूरमध्ये
तब्बल ३३ दिवसांत ७०० किमी पायी प्रवास करून ५ जुलैला पंढरपुरातील मुक्ताई मठात विसावा घेईल.
हा पालखी सोहळा संत मुक्ताईचे समाधी स्थळ असलेल्या कोथळी, मुक्ताईनगरातून ३ जूनला पंढरपूरकडे रवाना होईल,
आठ दिवस मुक्ताई पालखी पंढरीत
यंदा तिथीत वाढ असल्याने तीन दिवस अगोदर आषाढ शुद्ध षष्ठीस पालखी सोहळा पंढरपुरात पोहोचेल. त्यामुळे वारकऱ्यांना गर्दी आधीच पांडुरंगाचे दर्शन घेता येईल. आठ दिवस मुक्ताई पालखी सोहळ्याचा मुक्काम पंढरपुरात असेल. यादरम्यान विविध कार्यक्रम होतील,
भक्तगणांकडून जय्यत तयारी
यंदा संत मुक्ताईचे समाधी सप्त शतकोत्तर वर्ष आहे. त्यामुळे वारीत भाविकांची संख्या वाढेल, असा कयास आहे. त्यादृष्टीने नियोजन सुरु आहे. संत मुक्ताई संस्थानचे अध्यक्ष रवींद्र पाटील, सोहळा प्रमुख रवींद्र महाराज हरणे, व्यवस्थापक उद्धव महाराज जुनारे यांच्या मार्गदर्शनाखाली तयारी सुरु आहे.
डॉ.तुळशीराम गुट्टे महाराज लिखित
संत मुक्ताई पालखी सोहळा पुस्तकाचे उद्या प्रकाशन
युवा संत तथा संत साहित्याचे अभ्यासक डॉ. तुळशीराम गुट्टे महाराज लिखित संत मुक्ताई पालखी सोहळा पुस्तकाचे प्रकाशन शुक्रवार दि. ३ जून २०२२ रोजी सकाळी १० वाजतापालखी सोहळा प्रस्थान पूर्वी होणार आहे. श्री सिद्धीविनायक मानव कल्याण मिशनतर्फे आयोजित हा कार्यक्रम मुक्ताई नगर, कोथळी येथील संत मुक्ताई मंदीर येथे होणार आहे. राज्यभरातील भाविक सोहळयात सहभागी होणार आहेत.संत तुकाराम महाराजांचे वंशज बापूसाहेब मोरे महाराज यांच्या हस्ते पुस्तक प्रकाशित होणार आहे. यापूर्वी डॉ.गुट्टे महाराज यांची ६ पुस्तके प्रकाशित झाली असून, हे ७ वे पुस्तक आहेत. त्यात ओंकारेश्वर दर्शन, शंकराचे बिल्वदल, श्री गणेश स्तुती, यशस्वी जीवनाचा मार्ग, संत केदारी महाराजांची पंचक्रोशितील महती आणि “मुक्ताई जाहली प्रकाश” या पुस्तकांचा समावेश आहे. तर द पाथवे टू ए सक्सेसफुल लाइफ हे इंग्रजी भाषेतील पुस्तकाचा समावेश आहे.
प्रकशन सोहळ्यास नागरिकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन श्री सिध्दी विनायक मानव कल्याण मिशनच्या सर्व पदाधिकार्यांनी केले आहेत.