संत नामदेव महाराज रथ यात्रा आज महाराष्ट्रात दाखल
आज दि.२ रोजी पंजाब वरून तिर्थक्षेत्र मुक्ताईनगर येथे दाखल
पंढरपूर / प्रतिनिधी : संत शिरोमणी श्री नामदेव महाराज यांचे ७५२ व्या जयंती निमित्त श्री क्षेत्र पंढरपूर (महाराष्ट्र) ते श्री क्षेत्र घुमान (पंजाब) निघालेला संत नामदेव महाराज रथ यात्रा आज मध्यप्रदेशचा निरोप घेवून महाराष्ट्रात मुक्ताईनगर येथे दाखल झाली .
भागवत धर्म प्रसारक समिती , पालखी सोहळा पत्रकार संघ व नामदेव समाजोन्नती परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने श्री क्षेत्र पंढरपूर ते श्री क्षेत्र घुमान ही २३०० किलोमीटरची रथ व सायकल यात्रा दि. ४ नोव्हेंबर ते दि. ४ डिसेंबर २०२२ या दरम्यान काढण्यात आली होती .
कार्तिक शु|| एकादशी संत नामदेव महाराज यांची ७५२ वी जयंती , संत ज्ञानेश्वर माऊलींचा ७२५ वा संजीवन समाधी सोहळा व गुरुनानक जयंती याचे औचित्य साधून संत नामदेव महाराज यांच्या पंढरपूर येथील जन्मस्थानावरुन या यात्रेचा शुभारंभ राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा हस्ते करण्यात आला. महाराष्ट्र , गुजरात , राजस्थान , हरियाणा , पंजाब , उत्तरप्रदेश व मध्यप्रदेश राज्यांचा प्रवास करीत ही यात्रा मुक्ताईनगर येथे महाराष्ट्रात दाखल झाली . या सायकल यात्रेत राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीयस्तरावर सायकल रायडिंग केलेल्या व ५० पेक्षा अधिक वयोमान असलेल्या सुमारे ११० सायकलपटूनी सहभाग नोंदविला होता . राष्ट्रीयस्तरावर निघणारी ही पहिली आध्यात्मिक यात्रा होती . संत नामदेव महाराज ७०० वर्षापूर्वी ज्या मार्गाने पंजाब प्रांतात गेले त्याच मार्गाने ही रथ व सायकल यात्रा काढण्यात आल्याचे या यात्रेचे संयोजक व भागवत धर्म प्रसारक समितीचे अध्यक्ष सूर्यकांत भिसे यांनी सांगितले . ते म्हणाले , या यात्रेद्वारे भागवत धर्माच्या शांती , समता आणि बंधूता या विचारांचा प्रचार व प्रसार करण्यात आला .
राजभवन चंदिगड येथे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांच्या हस्ते या यात्रेचा समारोप झाला .
परतीच्या प्रवासात ही यात्रा उज्जैन , इंदोरमार्गे महाराष्ट्रात मुक्ताईनगर येथे दाखल झाली . या यात्रेचे संत मुक्ताबाई संस्थानचे अध्यक्ष ॲड रवींद्र भैय्यासाहेब पाटील , पालखी सोहळा प्रमुख रवींद्र हरणे यांच्यासह जळगांव जिल्हा शिंपी समाजाने मोठ्या उत्साही व भक्तीमय वातावरण स्वागत केले . ही यात्रा औरंगाबाद , पैठण , बीड , बार्शी मार्गे दि . ४ डिसेंबर रोजी श्री क्षेत्र पंढरपूरला पोहोचणार आहे .