शेतकऱ्यांची होणार दिवाळी गोड ! येत्या चार दिवसात पिक विम्याची रक्कम होणार खात्यात जमा – आ.चंद्रकांत पाटील
जळगाव जिल्ह्यात केळी उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळणार असून पुनर्रचित हवामानावर आधारित “फळ पिक विमा योजना” सन २०२२ मध्ये शेतकऱ्यांनी आपल्या पिकाचा विमा उतरविलेला होता, त्यातील प्रलंबित नुकसान ग्रस्त सुमारे चौपन्न हजार शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वीच म्हणजेच अवघ्या ४-५ दिवसात नुकसान भरपाईची रक्कम मिळणार असून ही रक्कम थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वर्ग केली जाणार आहे अशी माहिती आ.चंद्रकांत पाटील यांनी दिली.
मागील काळात भाजप खा.रक्षा खडसे यांनी मुक्ताईनगर च्याच एका आमदाराने तक्रार केल्याने पिक विमा रक्कम मिळत नसल्याचा आरोप केला होता.तर अवघ्या काही दिवसांनी राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी आ.चंद्रकांत पाटील यांच्यावर घणाघाती टीका करीत आ पाटलांमुळेच पिक विमा मिळत नसल्याच्या दावा केला होता. यावर आ.चंद्रकांत पाटील यांनी शेतकरी राजाच्या विरोधात कोणीच राजकीय व्यक्ती असे कृत्य करणारी नाही असे म्हणत आणि शेतकऱ्यांच्या नुकसानी पोटी पीक विम्याची रक्कम तात्काळ मिळावी यासाठी मुख्यमंत्री तसेच कृषी मंत्री यांच्या कडे केलेल्या पाठपुराव्याचे सांगत या संदर्भात लक्षवेधी केल्याचे विधानसभेतील व्हिडिओ देखील प्रसार माध्यमांना दिले होते आणि माझ्या तक्रारीचे एक पत्र जरी दाखविले तर राजकीय सन्यास घेण्याची घोषणा केली होती. परंतु अवघ्या काही दिवसातच जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष भाजप नेते नंदू महाजन यांनी राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांचेच पत्र पत्रकार परिषदेत सादर करून खडसे ना तोंडावर पाडले होते तर खासदार रक्षा खडसे यांना घरचा आहेर दिला होता.
यानंतर जिल्ह्यातील राजकारण बरेच ढवळून निघाले होते. दरम्यान केळी उत्पादक शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची रक्कम तात्काळ मिळावी म्हणून पालकमंत्री गुलाबराव पाटील , ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन , मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांचेसह आ.चंद्रकांत पाटील , आ.राजू मामा भोळे, आ.संजय सावकारे , आ.किशोर अप्पा पाटील ,आ. लताताई सावकारे,आ.मंगेश चव्हाण आ.चिमणराव पाटील यांचे कडून सतत पाठपुरावा सुरू होता तर विरोधक राष्ट्रवादी इतर पक्षांकडून आंदोलने करण्यात येत होती.
दरम्यान , केळी पिक विम्या वरून संपूर्ण वातावरण ढवळून निघालेले असताना शेतकऱ्यांच्या बँक खात्यात दिवाळी पूर्वी म्हणजेच येत्या चार ते पाच दिवसात नुकसान भरपाईची रक्कम मिळणार असल्याने बहु प्रतीक्षेत असलेले शेतकऱ्यांमध्ये प्रचंड आनंदाचे वातावरण आहे.
ही आहेत केळी विमा पात्र महसूल मंडळे –
1) रावेर – खिर्डी बु., खिरोदा, निंभोरा बु., सावदा, रावेर, खानापुर, ऐनपुर
2) चोपडा – अडावद, लासूर, धानोरा प्र.चोपडा, गोरगावले, हातेड बु., चाहर्डी
3) मुक्ताईनगर – घोडसगाव, अंतुर्ली, कुऱ्हा, मुक्ताईनगर
४) यावल – भालोद, साकळी, किनगाव बु., बामनोद, यावल, फैजपुर,
५) भुसावळ – वरणगाव, पिंपळगाव खु., भुसावळ
६) जामनेर – नेरी, शेंदुर्णी, मालदाभाडी, जामनेर, पहूर