विद्यापीठाची घोळचुक : चार जिल्ह्यातील T.Y B.com च्या विद्यार्थ्यांचे भवितव्य अंधारात !
आमदार चंद्रकांत पाटील यांनी राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री ना. उदय सामंत यांच्याकडे सरसकट गुण देण्याची केली मागणी
मुंबई : कवयित्री बहिणाबाई उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या गलथान कारभारामुळे दि. 14जून 2022 रोजी झालेल्या T.Y B.com च्या Indian Economic Scenario ( ८३६०१०) Sem 6 पेपरमध्ये 6 व्या सेमीस्टरचे प्रश्न येणे क्रमप्राप्त असताना या पेपर मध्ये 5 व्या सेमीस्टर चे प्रश्न टाकण्यात आले त्यामुळे विद्यापीठ अंतर्गत असलेल्या सुमारे चार जिल्ह्यातील फायनल इयर च्या विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात आले असून याप्रकरणी सखोल चौकशी होत पेपर तात्काळ रद्द करून विद्यार्थ्यांना सरसकट गुण देण्यात यावे अशा मागणीचे पत्र मुक्ताईनगर मतदार संघाचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री ना. उदय सामंत यांना मुंबई येथे दि.२० जून रोजी सोमवारी दिले.
त्यांनी दिलेली पत्रात म्हटले आहे की, दि. १४ जून २०२२ रोजी TY B.com चा Indian Economic Scenario या विषयाचा ६ व्या सेमिस्टरचा पेपर झाला. या विषयाचा पेपर कोड ८३६०१० असून या पेपरमध्ये संपूर्ण प्रश्न हे दिलेल्या अभ्यासक्रमानुसार नसून ते मागील ५ व्या सेमिस्टर मधील प्रश्न विचारण्यात आले होते. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण होऊन त्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाण्याची परिस्थिती निर्माण झालेली आहे. कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाची हि सर्वस्वी चूक असून याच्यामुळे सुमारे चार जिल्ह्यातील T.Y B.com च्या विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात आलेले आहे. अशा आशयाचे निवेदन विद्यार्थ्यांनी दिल्याचे त्यांनी पत्रात नमूद केले आहे.

तरी सदरील विषयाच्या अनुषंगाने याप्रकरणी सखोल चौकशी होत तात्काळ योग्य ती कारवाई करण्यात यावी तसेच Indian Economic Scenario या विषयाचा पेपर तात्काळ रद्द करून सर्व विद्यार्थ्यांना सरसकट गुण देण्यात यावे अशी मागणी आमदार चंद्रकांत पाटील यांनी पत्राद्वारे केली आहे..