वारकऱ्यांना मुक्ताईनगर ते पंढरपूर पायी दिंडीची लागली ओढ !
पायी दिंडीचे प्रस्थान अवघ्या २ दिवसांवर, पालखी सोहळ्याची जय्यत तयारी
मुक्ताईनगर – ‘भेटीलागी जीवा लागलीसे आस, पाहे रात्रंदिवस वाट तुझी’ अशी अवस्था भक्तांची झाली आहे. मुक्ताईनगर ते पंढरपूर अशी परंपरा असलेली तिर्थक्षेत्र समाधी स्थळ(कोथळी) मुळ मंदिर श्रीक्षेत्र मुक्ताईनगर येथून आषाढी वारी निमित्त पायी दिंडी पालखी सोहळा अवघ्या २ दिवसांवर येऊन ठेपला आहे. तसेच यंदा पालखी सोहळा आड मार्गाने न जाता सरळ महामार्गाने भव्य रथ सजावटीसह निघणार आहे त्यातच या पायी दिंडी सोहळ्याचे ३४ दिवसांचे मुक्काम ऐवजी केवळ २४ दिवसांचे मुक्काम आणि अंतरही १५० किमी कमी झाल्याने वारकऱ्यांना पायी दिंडी सोहळ्याची विशेष आस लागली आहे. वर्षानुवर्षे अखंड चालणाऱ्या वारीला कोरोनाचा ब्रेक लागला होता. मात्र, गतवर्षापासून ही पायीदिंडी पूर्ववतपणे सुरू झाली आहे. दरम्यान, सासुरवाशिणीला जशी माहेरची ओढ लागावी, तशी वारकऱ्यांना आता पायी दिंडीची ओढ लागली आहे. त्यामुळे दिंडीच्या तयारीत वारकरी गुंतले आहेत. आणि वारकऱ्यांमध्ये विशेष चैतन्याचे वातावरण निर्माण झाले आहे.
——————————————-
आड मार्गातील गावे यंदा पालखी सोहळ्याला मुकणार परंतु मुक्ताई अपार श्रद्धा असल्याने ही गावेच्या गावे व येथील वारकरी भाविक मोठ्या संख्येने पुढील मुक्कामा पर्यंत पायी दिंडी सोहळ्यात सहभागी होऊन आदिशक्ती मुक्ताई साहेबांचा पालखी सोहळा ऐतिहासिक करणार असल्याचे अनेक भाविक भावना व्यक्त करीत आहे.
——————————————-
रथ आणि सजावट असेल यंदा मुक्ताई पालखी सोहळ्याचे विशेष आकर्षण :
आदिशक्ति संत मुक्ताई पालखी सोहळा परंपरेने वारकऱ्यांनी पायी वाट निर्माण करून आजतागायत या मार्गाने पंढरपूर गाठत होता. परंतु यामध्ये आड मार्ग खेड्या पाड्यातून पालखी चा रथ नेणे कठीण होते. तसेच मुक्काम दर मुक्कामाला येणाऱ्या अडचणी , अंतरही ७५० किमी आणि ३४ दिवसांचा मुक्काम यामुळे भाविकांना इच्छा असूनही इतके दिवस खासगी अडचणींमुळे पालखी सोहळ्यात सहभागी होता येत नव्हते. त्यामुळे यंदा संत मुक्ताई संस्थान ने ऐतिहासिक निर्णय घेत सरळ महामार्गाचा रुट (मार्ग) तयार करून ३४ दिवसांऐवजी २४ दिवसांचा मुक्काम आणि ७५० किमी ऐवजी ६०० किमी चा प्रवास सरळ मार्गाने केल्याने आता अनेक भाविक व वारकऱ्यांना या पालखी सोहळ्यात सहभागी होणे सहज शक्य झालेले आहे.त्यामुळे संत ज्ञानदादा पालखी सोहळ्याप्रमाणे संत मुक्ताई पालखी सोहळा देखील थाटात मोठ्या रुबाबात पंढरपूर गाठून याची देही याची डोळा अनुभव घेवून आषाढी वारी चे व्रत सहज पूर्ण करतील.त्यामुळे यंदा विशेष करून भाविकांना दि.२ जून रोजी पंढरपूर कडे प्रस्थान करणाऱ्या संत मुक्ताई पायी दिंडी सोहळ्याचे वेध लागलेले आहेत.