वारकरी शिष्टमंडळाने घेतली मुख्यमंत्र्यांची भेट
वारकरी बांधवांच्या मागण्यांबाबत राज्य शासन सकारात्मक – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
*मंत्रालयात घुमला ‘पुंडलिक वरदा हरी विठ्ठल’चा गजर*
मुंबई,दि. ३: राज्यातील वारकरी संप्रदायाच्या विविध मागण्यांसंदर्भात वारकरी महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. राज्य शासनाला वारकरी बांधवांविषयी आत्मियता,आदर, सन्मान आहे. वारकऱ्यांच्या मागण्यांबाबतचा पाठपुरावा करण्यासाठी मंत्री दादाजी भुसे समन्वय करतील, असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी शिष्टमंडळाला सांगितले. मुख्यमंत्र्यांच्या सकारात्मक प्रतिसादामुळे यावेळी वारकरी बांधवांनी पुंडलिक वरदा हरी विठ्ठलचा एकच गजर केला. त्यामुळे मंत्रालयाच्या सातव्या मजल्यावरील मंत्रिमंडळ सभागृहातील मुख्यमंत्र्यांचे दालन दुमदुमले.
मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर या शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. यावेळी मंत्री सर्वश्री दादाजी भुसे, दीपक केसरकर, संजय राठोड यांच्यासह आळंदी येथील वारकरी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष, वारकरी प्रबोधन महासमिती, वारकरी महामंडळ,वारकरी प्रबोधन महासमिती, संत मुक्ताई संस्थान, मुक्ताईनगर, वारकरी महामंडळ (नाशिक जिल्हा व श्री वारकरी प्रबोधन महासमिती जिल्हाध्यक्ष), तारकेश्वर गड संस्थान (पाथर्डी, अहमदनगर) यांचे पदाधिकारी उपस्थित होते.
श्री. विठ्ठल रुक्मिणी मंदिर पंढरपूर हे शासनाच्या ताब्यातच रहावे,संपूर्ण भारतभर वारकरी संप्रदायाचा प्रचार प्रसार करणारे आळंदी येथील ‘पूज्य सदगुरु जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेत निवास, कीर्तन भवन, शिक्षण वर्ग, भजन हॉल करिता ४७ कोटी रुपयांचा निधी देण्यात यावा यासह विविध मागण्यांबाबत चर्चा करण्यात आली.
वारकरी बांधवांच्या मागण्यांबाबत राज्य शासन सकारात्मक असून त्याच्या पाठपुरावा करण्यासाठी मंत्री श्री. भुसे समन्वयन करतील, असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी शिष्टमंडळाला सांगितले. यावेळी शिष्टमंडळातर्फे मुख्यमंत्र्यांना ज्ञानेश्वरी भेट देण्यात आली.
शिष्टमंडळात ह.भ.प. संदिपान शिंदे, ह.भ.प. आसाराम बडे, ह.भ.प. शिवाजी काळे, ह.भ.प. संतोष सुंबे, बालाजी भालेराव, ह.भ.प. रामेश्वर शास्त्री, ह.भ.प. आदिनाथ शास्त्री, ह.भ.प. हरिदास हरिश्चंद्र, ह.भ.प. रविंद्र हरणे, ह.भ.प.नितीन अहिर , ह.भ.प. शेखर वानखेडे, ह.भ.प. सर्जेराव देशमुख यांच्यासह वारकरी बांधव उपस्थित होते.