मुक्ताईनगर शहरातील उर्वरित ४१३ घरांच्या पुनर्वसन टप्पा क्र.४ ला तात्काळ मंजुरी मिळावी आमदार चंद्रकांत पाटील यांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे मागणी !
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी खास बाब म्हणून तात्काळ प्रस्ताव करण्याच्या दिल्या संबंधीत विभागाला सूचना !!
मुंबई / मुक्ताईनगर : मुक्ताईनगर शहरातील उर्वरित ४१३ घरांच्या पुनर्वसन टप्पा क्र.४ ला खास बाब म्हणून तात्काळ मंजुरी मिळावी अशी मागणी मुक्ताईनगर मतदार संघाचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे दि.१७ मे मंगळवार रोजी वर्षां बंगल्यावर आयोजित शिवसेना आमदारांच्या बैठकीत केली.यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लागलीच संबंधीत विभागाच्या अधिकाऱ्यांना खास बाब म्हणून तात्काळ प्रस्ताव करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
आमदार चंद्रकांत पाटील यांनी दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, , माझ्या मुक्ताईनगर विधानसभा मतदार संघातील मुक्ताईनगर शहरातील एकूण १६६४ घरे पुनर्वसित करणे आवश्यक असल्याने त्यापैकी आज पावेतो सन १९७२-७३ साली टप्पा क्र. १ मध्ये ८८८ घरे, सन १९९५ साली टप्पा क्र.२ मध्ये १२३ घरे व सन २००७ साली टप्पा क्र.३ मध्ये २४० घरांचे पुनर्वसन झालेले आहे. तसेच एकूण १६६४ घरांपैकी ४१३ घरांचे पुनर्वसन करणे आवश्यक असून प्रस्ताव म. जिल्हाधिकारी जळगाव यांचेकडे प्रलंबित आहे. आज रोजी हतनूर ता. भुसावळ येथील धरण हे ५४% गाळाने भरलेले असून भविष्यात येणाऱ्या पावसामुळे धरण भरून मोठ्या प्रमाणात बॅक वाटर शहरात ज्या लोकांचे पुनर्वसन होणे बाकी आहे त्मा लोकांच्या घरामध्ये पाणी शिरून येथे जीवित व वित्त हानी होण्याची दाट शक्यता निर्माण झालेली आहे. तसेच गोळे समितीच्या अहवालानुसार प्रकल्प अहवालाच्या व्यतिरिक्त १७ अतिरिक्त गावांचे पुनर्वसन करणेबाबत शिफारास आहे. मुळ प्रकल्प अहवालानुसार व गोळे समितीच्या शिफारशीनुसारच्या गावांचे संपादना नंतरही विविध गावांच्या काही ज्यादा घरे संपादनाच्या मागण्या होत्या त्यानुसार ९ गावातील काही घरांचे संपादन व त्यांचे पुनर्वसन करण्यासाठी शासन निर्णय क्र. आरपीए-३२९६/ प्र.क्र.१५०/२-३ दिनांक ९ जुलै-१९९९ नुसार मान्यता आहे. महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाचे दि. २६ जून १९८६ शासन परिपत्रकानुसार नुसार गावांचे विशेष बाब म्हणून अतिशय सबळ व योग्य कारण असणे आवश्यक आहे. त्यामूळे मुक्ताईनगर शहरातील उर्वरित घरांच्या पुनर्वसनास (टप्पा क्र.४ ला) खास बाब म्हणून तात्काळ मंजुरी मिळावी अशी मागणी करण्यात आली आहे.
**********************
आदिशक्ति संत मुक्ताई मंदिराचे रखडलेले काम पुर्णत्वास जानेसाठी तात्काळ निधी उपलब्ध करावा तसेच अल्पसंख्याक पॉलिटेक्निक कॉलेज, सिंचनचे निधी अभावी खडलेले प्रकल्प च्या कामासाठी देखील निधी उपलब्ध व्हावा अशी मागणी आमदार चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली.