मुक्ताईनगर येथील MIDC च्या हालचाली गतिमान !
मुंबई येथील मंत्रालयात पार पडली महत्वपूर्ण बैठक
मुंबई : मुक्ताईनगर व बोदवड या दोघे तालुक्यांच्या मध्यभागी सारोळा गावाजवळ राज्य शासनाने मंजूर केलेल्या औद्योगीक वसाहतीसाठी हालचाली प्रचंड गतीमान झाल्या असून या अनुषंगाने आज दि.४ नोव्हेंबर रोजी मुंबईत पुन्हा एक महत्वपूर्ण आढावा बैठक पार पडली.
मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्या सातत्याच्या पाठपुराव्यामुळे तालुक्यात एमआयडीसी अर्थात औद्योगीक वसाहत मंजूर झाली असून याबाबत राज्य शासनातर्फे अधिकृत घोषणा देखील करण्यात आलेली आहे. तालुक्याच्या औद्योगीक वाटचालीला यामुळे चालना मिळणार असून अर्थातच यातून स्थानिक पातळीवर मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होत व्यापार तसेच शेती उद्योगाला देखील चालना मिळणार आहे.
दरम्यान, एमआयडीसी मंजूर झाल्यानंतर आमदार चंद्रकांत पाटील यांनी पुढील प्रक्रियेचाही पाठपुरावा शासन दरबारी सुरू केला आहे. या अनुषंगाने आज मंत्रालयात उद्योगमंत्री उदय सामंत आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत आढावा बैठक घेण्यात आली. याप्रसंगी आमदार चंद्रकांत पाटील यांच्यासह आमदार किशोर आप्पा पाटील तसेच औद्योगिक वसाहत मंडळाच्या तसेच इतर विभागाच्या सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांची ही उपस्थिती होती.

या संदर्भात आमदार चंद्रकांत पाटील म्हणाले की, राज्य शासनाने एमआयडीसी मंजूर केल्यानंतर याची पुढील प्रक्रिया आता गतीमान झाली असून लवकरच येथे प्लॉट अलॉटमेंटसह अन्य बाबी सुरू होणार आहेत. ही प्रक्रिया तात्काळ व्हावी यासाठी माझा पाठपुरावा सुरू असून या माध्यमातून मतदार संघाच्या इतिहासाला नवीन वळणार लागणार असल्याचेही त्यांनी आवर्जून नमूद केले
