मुक्ताईनगर महावितरण विभागात निकृष्ट कामे, कंत्राटदाराला ब्लॅकलीस्ट करा – डॉ.विवेक सोनवणे
मुक्ताईनगर महावितरण विभागामध्ये आर.डी.एस.एस योजनेअंतर्गत निमखेडी, सारोळा, उचंद्यासह २० सबस्टेशनचे गावठाण सेपरेशनचे ११ केव्ही विद्युत वाहिनीचे काम अंदाजपत्रकाला तिलांजली देऊन निकृष्ट, दर्जाहीन पद्धतीने करणाऱ्या अग्रवाल पावरला तात्काळ ब्लॅकलिस्ट करावी अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष डॉ. विवेक सोनवणे यांनी जळगाव महावितरणच्या मुख्य अभियंता यांच्याकडे केली आहे.
सोनवणे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मुक्ताईनगर विभागाअंतर्गत २० सब स्टेशनच्या गावठाण सेपरेशनचे काम अंदाजपत्रकाला तिलांजली देऊन काम सुरू असून पर्यवेक्षक अधिकाऱ्यांची अर्थपूर्ण अनुपस्थिती अग्रवाल पावर ठेकेदाराच्या पथ्यावर पडत आहे. सदर काम निकृष्ट होऊन पायाभूत आराखड्याच्या अधीक्षक अभियंता यांच्यासह पर्यवेक्षक अधिकाऱ्यांची आर्थिक भरभराट होत आहे. कारण आरडीएसएस योजनेअंतर्गत मुक्ताईनगर सह संपूर्ण जिल्ह्यात अग्रवाल पावरच्या माध्यमातून गावठाण सेपरेशनचे काम अत्यंत निकृष्टपणे अधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीत युद्धपातळीवर सुरू असल्याचे निवेदनात म्हटले आहे.
सदर ११ के. व्ही विद्युत वाहिनीच्या कामामध्ये कंडक्टर हा ५५ एमएम स्क्वेअर चा वापरणे बंधनकारक असताना अग्रवाल पावरच्या ठेकेदाराने तो फक्त ३४ एमएम स्क्वेअर चा वापरलेला आहे व अर्थपूर्ण भागीदारी असलेले महावितरण प्रशासन अग्रवाल पावरच्या निकृष्ट कामाला डोळेझाकपणे पाठबळ व आशीर्वाद देत आहे. तसेच विद्युत खांब उभे करताना खोदकामही अंदाजपत्रकानुसार करण्यात येत नसून अंदाजपत्रकानुसार सहा फूट खोल खड्ड्यांमध्ये पूर्ण काँक्रीट असणे बंधनकारक असताना त्यामध्ये काँक्रीटही वरच्यावर थातूरमातूर पद्धतीने मफिंगसाठी करण्यात येत आहे.
बहुतांश खांब हे काँक्रिटीकरण नसल्यामुळे माती गाडल्यामुळे या पावसामुळे कोलमडून पडलेले आहेत. काही ठिकाणी अशा अपघाताने जीवित व वित्त हानी होण्याची परिस्थिती निर्माण झालेली असून अग्रवाल पावर चा भोंगळ व भ्रष्ट कारभार सिद्ध होत असून सदर निकृष्ट कामावर महावितरणच्या संबंधित अधिकाऱ्यांकडून कोणतीही कार्यवाही न झाल्यामुळे अधीक्षक अभियंता (पायाभूत आराखडा) यांची आर्थिक भागीदारी सिद्ध होत असून आर.डी.एस.एस योजनेअंतर्गत मुक्ताईनगर सह संपूर्ण जिल्ह्यात गावठाण सेपरेशनचे निकृष्ट काम करणाऱ्या अग्रवाल पावरला तात्काळ ब्लॅकलिस्ट करण्यात यावे अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष डॉ. विवेक सोनवणे यांनी जळगाव महावितरणच्या मुख्य अभियंता यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
महावितरण मध्ये अशाच प्रकारे रोहित्र असतील, विजेच्या तारा बदलविने , अन्य कामे मेन्टेनन्स मधून केले जातात. या कामाचे ना कोणाला अंदाज पत्रक दिसून येते ना अदा केलेल्या देयकांची माहिती समोर येते अशातच जिल्हा नियोजन मधून शेतकऱ्यांसाठी निधी सह मंजूर झालेल्या रोहित्रांचे देखील क्रय विक्रय झाल्याचे मागील काळात ओरड होती. त्यामुळे ठेकेदारांची मनमानी आणि अधिकाऱ्यांची चंगळ या बाबीकडे दुर्लक्ष होत असल्याने पिळवणूक मात्र सर्व सामान्य जनतेची होत आहे.