मलेरिया व डेंग्यू सदृश्य आजारांनी नागरिक त्रस्त,
शहरात धुरळणी फवारणी करण्याची शिवसेनेची मागणी
मुक्ताईनगर शहरात मलेरिया व डेंग्यू सदृश्य तसेच इतर साथीच्या आजारांनी थैमान घातलेले असून नागरिकांच्या आरोग्य बचावासाठी तात्काळ धुरळणी व औषध फवारणी करण्यात यावी अशी मागणी शिवसेनेतर्फे करण्यात आली आहे.
शिवसेनेतर्फे देण्यात आलेला निवेदनात म्हटले आहे की. मुक्ताईनगर शहरातील मागील काळात सततच्या पाऊस व नुकतेच येवून गेलेल्या पूर स्थितीने डासांचे प्रमाण खूपच वाढलेले असून यामुळे मात्र शहरामध्ये मलेरिया व डेंग्यू सदृश्य तसेच इतर साथीच्या आजारांनी थैमान घातलेले आहे. उपजिल्हा रुग्णालयापासून सर्वच खासगी रुग्णालये हाउस फुल झालेले आहेत. तर काही रुग्णांची परिस्थिती गंभीर होत चाललेली आहे अशा परिस्थिती मध्ये आरोग्य यंत्रणा देखील कुचकामी होण्याची परिस्थिती निर्माण झालेली आहे. त्यामुळे या आजारांचे स्तोम रोखण्यासाठी नगरपंचायत प्रशासनाने तात्काळ शहरात डास व किटाणू प्रतिबंधात्मक धुरळणी, फवारणी करावी तसेच गटारीची स्वच्छता देखील करण्यात यावी. अशा मागणीचे निवेदन मुख्याधिकारी गजानन तायडे यांना देण्यात आलेला असून याप्रकरणी दिरंगाई झाल्यास शिवसेनेतर्फे तिव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे.
यावेळी माजी नगराध्यक्षा नजमा तडवी , शिवसेना तालुका प्रमुख छोटू बाबुराव भोई, भाजप विधानसभा क्षेत्र प्रमुख ललित महाजन , शिवसेना शहर प्रमुख प्रशांत उर्फ गणेश टोंगे, शहर संघटक वसंत भलभले , माजी नगरसेवक पियुश भागवत मोरे, संतोष सुपडू मराठे, संतोष (बबलू) कोळी, निलेश प्रभाकर शिरसाट आदींची उपस्थिती होती.