भक्तश्रेष्ठ श्रीचोखोबांची पुण्यतिथी
अक्षय जाधव, आळंदी
“ऊस डोंगा परी रस नव्हे डोंगा । काय भुललासी वरलीया रंगा ।।” असं परखडपणे सर्व समाजाला सांगणारे संतश्रेष्ठ भक्तशिरोमणी श्रीचोखोबारायांची आज पुण्यतिथी.वैशाख शुद्ध पंचमीला गुरुवारी चोखोबारायांनी शके १२६० इ.स.१३३८ ला मंगळवेढे येथे देह ठेवला त्याला आज ६८२ वर्ष झालेत. तरीही हा समाज या वरवरच्या रंगालाच भुललेला आहे ही शोकांतीका आहे.आमच्या घरात करुणाब्रम्ह ज्ञानेश्वर माउलींवर विशेष श्रद्धा, प्रेम आणि याच मुळे वारकरी संप्रदाय लहानपणापासुनच जवळचा…मला माझ्या आजवरच्या जिवनात, वैचारीक जडणघडणीत दोन संतांनी अत्यंत सजग केलयं, घडवलय,माझ्या विचारांवर ज्यांचा अत्यंत प्रभाव आहे अशे भक्तश्रेष्ठ चोखोबाराय आणि शांतिब्रम्ह एकनाथ महाराज.समाजातील अगदी टोकं समजल्या जाणार्या भिन्न असनार्या कुळात नाथांचा आणि चोखोबांचा जन्म झाला पण दोघांनीही या सर्वांच्या पुढे येऊन समाजातील विषमता,भेदाभेद,तथाकथीत कर्मठता डावलुन मानवतेच्या,भक्तीच्या आणि प्रेमाच्या जोरावर प्रत्यक्ष श्रीपांडुरंगालाही आपलेसे केले.शुद्ध भक्ती हाच अध्यात्माचा ,साधनेचा प्राण आहे,हेच श्रीभगवंतालाही प्रिय आहे हे सर्व जगाला दाखवुन दिलं.भक्ती विरहीत केलेले कर्म,साधन,उपासना ही कोरड्या विहीरीसारखी असते,त्याचा काहीही उपयोग नसतो.
जिवनात काही अशा घटना घडतात की ज्या या सर्वांचा विचार करायला भाग पाडतात.आपण ज्याला साधन,उपासना ,धर्म म्हणतो त्या चाकोरीचा भंग करुन परत त्याबाबत अंतर्मृख होवुन चिंतन करायला लावतात व अशाच काही घटनांचा अनुभव मलाही अनुभवायला मिळाला.आजही काही ठिकाणी तुमची जात,आडनाव विचारुन मठात प्रवेश दिला जातो,आजही आपण पाण्याच्या बादलीला हात लावला तर पाणी पिण्या योग्य राहत नाही,आजही जात बघुन जेव्हा तथाकथीत प्रवचनकार तोंड फिरवुन तुम्हाला खोलीबाहेर काढतात तेव्हा मग डोक्यात,मनात विचारांचे काहुर माजते..संतांनी सांगीतलेला धर्म हाच का? अशे प्रश्न पडतात आणि मग अंतर्मृख होवुन चित्त याचं उत्तर शोधायला लागतं. हेच शोधतांना दोन संतरत्न माझ्या मनाला अतिशय भावले,मनात घर करुन गेले,माझ्या विचारांना दिशा देऊन गेले ते संत म्हणजे आपले “नाथबाबा” आणि “चोखोबा”. चोखोबांनी,नाथांनी केली ती खरी भक्ती ,ते खरे वैष्णव ,याच सर्व संतांनी भगवंतांच्या भेटीचा खरा मार्ग समाजाला दाखवला.तीच भक्ती आपल्याला मानवातही भगवंताचे दर्शन घडवु शकते.
श्रीचोखोबाराय हे श्रीज्ञानेश्वर माउली, श्रीनामदेवराय,श्रीगोरोबा काका,श्रीसावता महाराजांचे समकालीन. चोखोबांना तत्कालिन वर्णाश्रम धर्माच्या नावाखाली भेदाभेद,अवहेलना ,द्वेष करणार्या व रुढीत जखडलेल्या समाजाने जरी दूर लोटले तरी या सर्व संतांनी चोखोबांना हृदयासी लावले.आपल्या शुद्ध भक्तीमुळे चोखोबांनी या सर्व संतमंडळींमध्ये आपले स्वत:चे वेगळे स्थान निर्माण केले .इतर संतांच्या वाङमयाच्या तुलनेत चोखोबांचे आज अवघे ३५० अभंग उपलब्ध आहेत.चोखोबा स्वत: निरक्षर होते.जर त्यांना लिहीता वाचता आलं असतं तर काय स्वानुभवाचे शब्दभंडार त्यांनी लिहुन ठेवले असते याची कल्पनाही करवत नाही.शेवटी आपलं सर्वांचं दुर्देवं..पण यातही सुदैवाने मंगळवेढ्यातील एक सज्जन ब्राम्हण कुटुंबातील आनंद भट्ट यांनी चोखोबांचा अधिकार ओळखुन हे सर्व अभंग लिहुन ठेवले.यासाठी संपुर्ण समाज त्यांचा ऋणी राहील.
चोखोबा हे तथाकथीत अस्पृश्य समाजात जन्माला आले होते.त्यामुळे त्यांना जिवनभर अवहेलना,हेटाळणी,द्वेष,तिरस्कार यांनाच सामोरं जावं लागलं.पण चोखोबांनी व इतर संतांनी कधीही या लोकांचा द्वेष व तिरस्कार केला नाही मुळात हेच खरं संतत्व. उलट चोखोबांनी आपल्या शद्ध भक्ती व शुद्ध भावाने श्रीसंतश्रेष्ठ नामदेवरायां सारखे सद्गुरु मिळवले,प्रत्यक्ष पांडुरंगाला आपलेसे केलं.चोखोबांच्या अभंगांचा जर विचार केला तर इतर संतांच्या तुलनेत त्यात समाजातील या विषमते बद्दलची जास्त वेदना,कळकळ,दु:खाची जाणिव होते. दुर्दैव हे की आजही समाजात असे प्रकार जेव्हा घडतात तेव्हा चोखोबांच्या या अभंगातील जाणीव अजुनच जवळुन प्रखर जाणवते.
हिन याती माझी देवा | कैसी घडे तुझी सेवा ||१||
मज दूर दूर हो म्हणती |तुज भेटूं कवण्यारीती ||२||
माझा लागतांची कर | सिंतोडा घेताती करार ||३||
माझ्या गोविंदा गोपाळा | करुणा भाकी चोखामेळा ||४||
ही वेदना ,ही खंत चोखोबांच्या अभंगात ठिकठिकाणी जाणवते.
जोवर मला या वणव्याचा ,दाहाची एक झलक सोसावी लागली नाही तोवर याची वास्तवता,भिषणता कळलीच नाही.पण ज्यादिवशी प्रत्यक्ष अनुभवाला आले तेव्हा मात्र अनेक प्रश्न मला पडत गेले.भगवंताला काय प्रिय आहे ? धर्म मानवाला काय शिकवतो ? तथाकथीत अस्पृश्य असलेले चोखोबा प्रत्यक्ष श्रीभगवंतांचे कसे झाले ? कशामुळे भगवंतांनी चोखोबांची ढोरे ओढली ? का भगवंत चोखोबांच्या घरी सुईन म्हणुन गेले ? सुदैवाने श्रीचोखोबांनीच याचे उत्तर ही देऊन ठेवले आहे. चोखोबा म्हणतात
आमुचा आम्ही केला भावबळी | भावे वनमाळी आकळीला ||१||
भावाची कारण भावाची कारण | भावें देव शरण भाविकांसी ||२||
निजभावबळे घातिलासे वेढा | देव चहुंकडा कोंडियेला ||३||
चोखा म्हणे देव भावाचा बांधला | भक्तांचा अंकिला म्हणुनी झाला ||४||
अशा स्वानंदाच्या सिंहासनावर आरुढ झालेल्या श्री चोखोबारायांच्या चरित्रातील हाच शुद्ध भाव आपल्या सर्व वैष्णवांच्या जिवनात कणभर का होईना पण उतरावा हीच या पुण्यतिथी दिनी श्रीचोखोबारायांच्या चरणी कोटी कोटी प्रार्थना!!!🙏🌸🌺🚩🌹
शब्दांकन : अक्षय जाधव, आळंदी