Friday, July 4, 2025
Muktai Varta
  • होम
  • मुक्ताई वार्ता
  • जळगाव
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • खेळ
  • व्हायरल
  • मनोरंजन
  • लाईफस्टाईल
No Result
View All Result
Muktai Varta
No Result
View All Result

प्रपंच, परमार्थाचा नेटका मंत्र देणारे श्री समर्थ रामदास स्वामी …

Admin by Admin
November 14, 2022
in मुक्ताई वार्ता
0
प्रपंच, परमार्थाचा नेटका मंत्र देणारे श्री समर्थ रामदास स्वामी …
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

प्रपंच, परमार्थाचा नेटका मंत्र देणारे श्री समर्थ रामदास स्वामी …

रामाला व हनुमंताला उपास्य मानून परमार्थ, स्वधर्मनिष्ठा, राष्ट्रप्रेम याची शिकवण अधिकार वाणीने देणारे संत समर्थ रामदास स्वामी यांची आज पुण्यतिथी आहे. माघ वद्य नवमीला रामदास स्वामी समाधीस्त झाले. म्हणून या तिथीला रामदास नवमी असे संबोधले जाते. बलोपासनाचे समर्थक, मनाचे श्लोक, दासबोध यातून प्रापंचिक ज्ञान आणि परमार्थिक मार्गाची दिशा देणाऱ्या रामदास स्वामींच्या चरित्राचा अगदी थोडक्यात आढावा….

बालपण व पूर्वायुष्य

समर्थ रामदास स्वामींच्या वडील सूर्याजीपंत ठोसर निस्सीम सूर्योपासक होते. गंगाधर व नारायण या दोन पुत्रांचा जन्म सूर्यनारायणाने दिलेल्या वरदानामुळे झाला, अशी त्यांची श्रद्धा होती. समर्थ रामदास स्वामींचा जन्म रामनवमीच्या दिवशी म्हणजे चैत्र शुद्ध नवमीस झाला. नारायण लहानपणापासूनच अतिशय बुद्धिमान, निश्चयी तसेच खोडकरही होता. हाती घेतलेले काम तडीस न्यावयाचे, असा त्याचा बाणा असायचा. नारायणाने मित्रांच्या सहवासात बालपणीच त्या-त्या व्यवसायाचे उत्तम ज्ञान प्राप्त करून घेतले होते. निरीक्षणाने आणि अनुभवाने तो सगळ्या गोष्टी शिकला. रामदास स्वामींच्या बालपणाची एक गोष्ट प्रसिद्ध आहे. एकदा नारायण लपून बसला. काही केल्या सापडेना. अखेर एका फडताळात सापडला. काय करीत होता, असे विचारल्यावर, आई, चिंता करितो विश्वाची, असे उत्तर त्याने दिले होते.

तपश्चर्या, साधना आणि तीर्थयात्रा

या मुलाचा विवाह करण्याचा घाट कुटुंबियांनी घातला. मात्र, बोहोल्यावर उभे असताना सावधान शब्द ऐकताच ते नेसत्या वस्त्रानिशी मंडपातून पळून गेले. यानंतर त्यांनी पंचवटी येथे जाऊन रामाचे दर्शन घेतले आणि टाकळीस दीर्घ तपश्चर्या केली. विद्यार्थ्याची दिनचर्या कशी असावी, याचा एक आदर्शच समर्थांनी त्याकाळी प्रस्थापित केला. पहाटे ब्राह्ममुहूर्तावर उठून ते दररोज १२०० सूर्यनमस्कार घालत असत. रामदासांनी रामनामाचे १३ कोटी वेळा नामस्मरण करून झाल्यावर अवतार कार्याला आरंभ केला, असे सांगितले जाते. १२ वर्षाच्या या तीव्र तपश्चर्येनंतर यांना आत्मसाक्षात्कार झाला, असे म्हणतात. तपश्चर्या संपल्यानंतर समर्थांनी १२ वर्षे भारतभ्रमण केले. सारा हिंदुस्थान पालथा घातला. प्रत्येक ठिकाणच्या लोकस्थितीचे निरीक्षण केले.

जीवनकार्य

वयाच्या ३६व्या वर्षी रामदासस्वामी महाराष्ट्रात परत आले. समर्थांच्या शिष्य मंडळींमध्ये सर्व प्रकारचे शिष्य होते. रामदास स्वामींची उपदेशाची भाषा अत्यंत साधी व सोपी होती. १२ वर्षाच्या प्रवासांत रामदास स्वामींनी जे पाहिले, ते भयंकर होते. सर्वस्वी नि:सत्त्व आणि दुर्बल झालेल्या आपल्या समाजास परमार्थाचा उपदेश हानिकारकच ठरेल. समाजाला प्रथम संघटित आणि शक्तिसंपन्न बनविले पाहिजे, समाजाचा आत्मविश्वास पुन्हा जागृत केला पाहिजे, अशी त्यांची खात्री झाली. तेव्हा रामदास स्वामींनी आपले बाहू उभारून खणखणीत वाणीने लोकांना उपदेश केला. विविध विषयांतून लीलया समाजप्रबोधन करणारे रामदास स्वामी छत्रपती शिवाजी महाराजांच्या लोकोत्तर कार्याने भारावून गेले. छत्रपती शिवाजी महाराजांना समर्थांनी सर्वतोपरी मदत केली असे समर्थ रामदास स्वामींच्या चरित्रातून सांगितले जाते.

रामदास स्वामींचे तत्त्वज्ञान

रामदास स्वामी अद्वैत तत्त्वज्ञानाचे पुरस्कर्ते होते. केवळ ब्रह्म हेच सत्य आहे, हा विचार त्यांच्या साहित्यात सर्वत्र दिसतो. परब्रह्म, मूळमाया, गुणमाया, त्रिगुण, पंचमहाभूते, अष्टधा प्रकृती, विश्वाची उभारणी व संहार, पिंड-ब्रह्मांड रचना व त्यांचे संबंध, अशा अनेक विषयांचे चिंतन समर्थांच्या साहित्यात आहे. सर्व कर्मांचा कर्ता हा राम असून, आपण मिथ्या अहंकारामुळे स्वतःकडे कर्तेपण घेतो, असे ते नेहमी सांगत. परमार्थाशिवाय केलेला प्रपंच उपयोगाचा नाही. देवाचे वैभव वाढवावे, नाना उत्सव करावे, असे त्यांचे मत होते. समर्थांनी प्रत्ययाचे ज्ञान सर्वश्रेष्ठ मानले. भोंदू गुरू व बावळट शिष्य हे परस्परांचे नुकसान करतात, असे त्यांनी सांगितले आहे. कर्म, भक्ती, ज्ञान या मार्गांचे अनुसरण करून मुक्त होण्याचे सर्वोच्च लक्ष्य त्यांनी शिष्यांपुढे ठेवले, अनेक दंडक घालून दिले.

समर्थांचे साहित्य व काव्यनिर्मिती

समाजाविषयीच्या अपार तळमळीतून समर्थांनी अफाट, विपुल वाङ्‌मय निर्मिती केली. दासबोध, मनाचे श्लोक, करुणाष्टके, भीमरूपी स्तोत्र,अनेक आरत्या उदाहरणार्थ, सुखकर्ता दुखहर्ता, ही गणपतीची आरती, लवथवती विक्राळा ब्रम्हांडी माळा, ही शंकराची आरती, अशा त्यांच्या लेखनकृती प्रसिद्ध आहेत. याशिवाय रामायणांतील किष्किंधा, सुंदर व युद्ध ही कांडे, अनेकविध अभंग, आरत्या, भूपाळ्या, पदे, स्तोत्रे, राज-धर्म, क्षात्र-धर्म, शिवाजी महाराज, संभाजी महाराज यांस पत्रे, आपल्या शिष्यांना मार्गदर्शन, मठ आणि त्यांतील उत्सव यांसंबंधी मार्गदर्शन, आत्माराम, अन्वय-व्यतिरेक, वैराग्य-शतक, ज्ञान-शतक, उपदेश-शतक, षड्‌रिपु-विवेक आदी विषयांवरील विपुल लेखन समर्थांनी केले आहे. समृद्ध शब्दरचना, मराठी शब्दांची वैभवशाली उधळण, तर्कशुद्ध विचारांची रेखीव व नेटकी मांडणी आणि माणसाच्या जीवनाचे, अगदी छोट्या-छोट्या व्यवहारांचे सूक्ष्म निरीक्षण ही समर्थांच्या लेखनाची काही वैशिष्ट्ये सांगता येतील.

Previous Post

#रामरक्षा

Next Post

श्री.संत मुक्ताई मंदिरातील सेवेकरी आत्माराम हातोळकर यांचे हृदयविकाराने दुःखद निधन 

Admin

Admin

Next Post
श्री.संत मुक्ताई मंदिरातील सेवेकरी आत्माराम हातोळकर यांचे हृदयविकाराने दुःखद निधन 

श्री.संत मुक्ताई मंदिरातील सेवेकरी आत्माराम हातोळकर यांचे हृदयविकाराने दुःखद निधन 

संपादक : संतोष सुपडू मराठे

वार्ता संग्रह

July 2025
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
28293031  
« Jun    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • मुक्ताई वार्ता
  • जळगाव
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • खेळ
  • व्हायरल
  • मनोरंजन
  • लाईफस्टाईल

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group