निवडणुक संशयाच्या फेऱ्यात, स्ट्रॉग रुम, इव्हीएम साठवणूक कक्षाकडे इसमाचा अनधिकृतरित्या प्रवेश
मुक्ताईनगर दि. ८ : लोकसभा सार्वत्रिक निवडणुकी २०२४ च्या अनुषंगाने जिल्हा प्रशासनाने निवडणूक यंत्रणा सज्ज ठेवली आहे. मुक्ताईनगर मतदार संघाची देखील निवडणूक यंत्रणा १३ मे रोजी होऊ घातलेल्या मतदानाच्या अनुषंगाने संपुर्ण व्यवस्थेसाठी कामाला लागलेली असून शहरातील संत मुक्ताबाई कला व वाणिज्य महाविद्यालय मुक्ताईनगर येथे इनडोअर स्टेडियम मध्ये स्ट्रॉग रुम, इव्हीएम साठवणूक कक्ष उभारण्यात आलेले आहे. या ठिकाणी सीसीटीवी यंत्रणा, अग्नीरोधक यंत्रणा, डबल-लॉक सिस्टीम व परिसरातील सुरक्षा यंत्रणेचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे.. स्ट्रॉगरुम म्हणून निवड केलेल्या संत मुक्ताबाई कला व वाणिज्य महाविद्यालयाचा परिसर त्रिस्तरीय बॅरिकेट लावून सुरक्षीत करण्यात आलेला आहे.
या ठिकाणी निवडणूक अधिकारी व कर्मचारी व्यतिरिक्त इतर कोणालाही मुक्त रित्या संचार करण्यास मज्जाव करण्यात आलेला आहे. असे असताना एका राजकीय व्यक्तीचे कट्टर समर्थक, राजकीय पदाधिकारी व दुई ता.मुक्ताईनगर येथील माजी सरपंचाने येथील स्ट्रॉग रुम मध्ये इव्हीएम सारखे गोपनीय व अतिसंवेदनशिल विषय हाताळले जात असताना अनधिकृत रित्या प्रवेश केला. अतिशय गोपनीय व संवेदनशील कामकाज येथे सुरू असताना अशा प्रकारे एखाद्या राजकीय पक्षाचा व्यक्ती येथे अनधिकृत रित्या प्रवेश करून मुक्तपणे संचार करताना आढळून आल्याने सुरवातीला भांबावलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी त्या व्यक्तीला अटक करून पोलिसांच्या स्वाधीन केले. परंतु सदरील व्यक्तीवर आचार संहिता भंग कायदा , स्ट्रॉग रुम मध्ये प्रवेश केलेप्रकरणी गंभीर स्वरूपाची कारवाई होऊन गुन्हे दाखल होणे क्रमप्राप्त होते. परंतु निवडणूक निर्णय अधिकारी, तहसीलदार व पोलिसांनी पुढील कुठलीही कारवाई न करता सदर व्यक्तीला सोडून दिल्याने याप्रकरणात मोठी आर्थिक देवाण घेवाण झाल्याची चर्चा आहे. मात्र या गंभीर प्रकाराने येत्या १३ मे रोजी होणाऱ्या निवडणुकीचे कामकाज मात्र कोणत्या धर्तीवर निःपक्ष पातीपणे पार पडेल याबाबत देखील चर्चांना उधाण आलेले असून मुक्ताईनगर क्षेत्रातील निवडणूक संशयाच्या फेऱ्यात आलेली आहे. त्यामुळे वरिष्ठांनी याप्रकरणी दखल घेवून सखोल चौकशी करून संबंधितांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी होत आहे.
परंतु सदरील व्यक्ती खडसे समर्थक असल्याने, भाजप उमेदवाराकडून आक्षेप घेतला गेला नाही. आणि दुसऱ्या पक्षातही खडसे असल्याने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडूनही कुठलाही आक्षेप घेतला गेला नसला तरीही पारदर्शक निवडणूक व्हावी अशी अपेक्षा बाळगणाऱ्या नागरिकांकडून मात्र याप्रकरणी कारवाई व्हायला पाहिजे होती अशी चर्चा आहे.