नकट्यांना चपटे कानोळे…
बे – संस्काराच्या जुगारी अड्डा चालकांचे पत्रकार परिषदेत मळलेल्या कपड्यांचे धुणे
मुक्ताईनगर : मुक्ताईनगर तालुक्यातील पुरणाड फाट्यावर गेल्या अनेक वर्षापासून जुगारी अड्डा बिन बोभाटपणे सुरू आहे . मागील काळात मोठ मोठ्या पोलिसी कारवाया येथे झालेल्या आहेत. तर येथे जुगार खेळण्यासाठी राज्यभरातील नामचीन गुंड (अवैध धारदार शस्त्रे, गावठी पिस्तूल बाळगलेले) प्रवृत्तीचे व गर्भ श्रीमंत लोक येत असतात. त्यामुळे येथे करोडो रुपयांची उलाढाल होत असते. मध्यंतरी राजकीय आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या गेल्याने येथे अवकळा आली होती.परंतु उसामा जिमखाना स्पोर्टस् असोसिएशन भुसावळ जि. जळगांव यांच्या मनोरंजनाच्या परवान्याचा आधार घेवून नोंदणी प्रमाणपत्रची पुरनाड येथे उपशाखा बनवून येथे इतर मनोरंजनाचे खेळ कमी परंतु बिनबोभाटपणे जुगारी अड्डा सुरू होता. पोलिस फक्त नोंदणी अधिनियम व अटी व कायद्यांचे कुठे उल्लंघन होते याची वाट पाहत होते. आणि तो दिवस उजाडला दिनांक ६ जून २०२२ रोजी मध्यरात्री पोलिसांनी केलेल्या कारवाईत लाखो रुपये नगदी कॅश व सुमारे १३.५ लाखापर्यंत चा ऐवज व १५ लोकांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. यात अध्यक्ष व सचिव आरोपी आहेत. तरी यासंदर्भात पोलिसांनी नोंदणी करणारे धर्मादाय संस्था कार्यालय जळगाव यांचेकडील नोंदणी प्रमाणपत्र रद्द करण्या संदर्भात दाखल गुन्ह्याच्या अनुषंगाने अद्याप पावेतो कुठलीही कार्यवाही किंवा पत्रव्यवहार का केला नाही असा सवाल उपस्थित होत आहे .
उलट पक्षी नकट्यांना चपटे कानोळे, बे – संस्काराच्या जुगारी अड्डा चालकांनी चक्क पत्रकार परिषद घेवून दाखल गुन्हा खोटा असल्याचा कांगावा करीत मळलेल्या कपड्यांचे धुणेच धुतल्याचा प्रकार केल्याची चर्चा आहे.
अवैध दोन नंबरचे धंदे चालकांची पत्रकार परिषद :
“स्पष्टपणे अवैध धंद्यांचे गुन्हे दाखल असलेल्या अवैध धंदे जुगारी अड्डे चालकांकडून चक्क पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात येते आणि त्या पत्रकार परिषदेला पत्रकार उपस्थिती राहून अवैध धंदे चालकांच्या बाजूनेच बातम्या लावल्या जातात यामुळे पत्रकारितेचाही दर्जा घसरल्याची सर्वसामान्यांमध्ये चर्चा आहे.”
या सर्व प्रकारावर संताचे विचार मांडवेसे वाटतात..
एकनाथी भारूड …
मुंगी व्याली शिंगी झाली तिचें दुध किती ।
सतरा रांजण भरुन गेले पेले बारा हत्ती ॥१॥
आम्ही लटिकें न बोलूं वर्तमान खोटें ॥२॥
लटिकें गेलें कटकें तेथें गाडग्याएवढें राळें ।
उडत चिमणी चरत चाले तिचे वाटीएवढें डोळे ॥३॥
शेळी करी गुसळण तेथें मांजर काढी लोणी ।
उंदीर गेले देशांतरा ताकें भरल्या गोणी ॥४॥
पाण्यांत कासव गीत गाय वनांत कोल्हा नाचे ।
सावज मनीं संतोषला खेकड पुस्तक वाचे ॥५॥
कांतणी घरीं लग्न लागलें सरडा कणीक कांडी ।
बागूल वंध्या कण्या परणी घुबड मांडे रांधी ॥६॥
बाभूलीचें खोडीं माशानें केलें कोटें ।
सशाने सिंह ग्रासिला बेडुक आलें लोटें ॥७॥
विष्णुदास नामा म्हणे ऎका त्याची ख्याती ।
लटिकें म्हणतील त्यांचे पूर्वज नरका जाती ॥८॥
भावर्थ – माणूस एकदा थापा मारू लागला नि खोटे बोलू लागला नि सतत खोटे बोलण्याची सवय झाली की मग कसलेच ताळतंत्र राहत नाही. मग खोटे बोलण्यात नि थापा मारण्यात एवढं निर्ढावलेपण येतं की त्याची लाजही वाटत नाही. वरती पुन्हा हा थापेबाज म्हणतो आम्ही लटिके न बोलू आणि वास्तवाला खोटे ठरवतो !
कांहीही नि कितीही खोटे बोलून, यथेच्छ थापा मारणा-या थापेबाजावर संत एकनाथ महाराजांनी भारूडातून केलेला हा प्रहार आहे. बाकी असा थोर थापेबाज कोण,…
हे समजलं असेलच ना?