धर्म परंपरा : संत मुक्ताईची तीनदिवसीय परिक्रमा सोमवारपासून, ५६ किमी पायी प्रवास
सहभागी होणाऱ्या भाविकांना 23 रोजी उपस्थित राहण्याचे आवाहन
संत मुक्ताईनगर : संत मुक्ताईनगर येथील संत मुक्ताई समाधी स्थळाची श्री क्षेत्र महतनगर पंचक्रोशी परिक्रमा २३ ते २५ जानेवारी अशा तीन दिवसांमध्ये होईल. परिक्रमेचे प्रस्थान २३ रोजी सोमवारी सकाळी ८ वाजता मूळ मंदिरावरून होईल. या संपूर्ण परिक्रमेचे अंतर ५६ किलोमीटर आहे. पैकी दोन किमी प्रवास नावेतून स करावा लागेल अशी माहिती संस्थानचे अध्यक्ष ॲड.रवींद्र पाटील, संत मुक्ताई पालखी सोहळा प्रमुख रवींद्र हरणे महाराज व जुने मुक्ताई मंदिर व्यवस्थापक उद्धव जुनारे महाराज यांनी दिली. ज्या भाविकांना परिक्रमेत सहभागी व्हायचे असेल त्यांनी २३ जानेवारीला सकाळी जुन्या मंदिरात हजर रहावे. नित्य औषधी, अंथरूण पांघरूण सोबत घ्यावे. कुणीही दागदागिने किंवा मौल्यवान वस्तू सोबत घेऊ नये असे आवाहन करण्यात आले आहे.
परिक्रमेचे पौराणिक महत्त्व :
सनातन वैदिक धर्मात धार्मिक तीर्थक्षेत्र, नदी-पर्वतांना पंचकोस, ८४ कोस अशा विविध परिक्रमा करण्याची परंपरा आहे. अयोध्या, वृंदावन, चित्रकुट, ओंकारेश्वर, नर्मदा, तापी, गंगा, उज्जैनसह आळंदी सासवड, त्र्यंबकेश्वर, पंढरपूर त्याचप्रमाणे श्री क्षेत्र मुक्ताई समाधिस्थळ (पूर्वीचे महतनगर) परिक्रमा आहे. ही परिक्रमा दक्षिणावर्त म्हणजेच घड्याळाच्या काट्याप्रमाणे (देवस्थान देवता नदी पर्वतांना आपल्या उजव्या हाताला ठेवून) करावी असे निर्देश आहेत. परिक्रमेत कायिक, वाचिक, मानसिक तप घडते.
पहिला मुक्काम उचंदे, दुसरा निमखेडी खुर्दला
23 जानेवारी : सकाळी ८ वाजता मुक्ताईच्या मूळ स्थळावरून प्रस्थान, ९ वाजता वढवे फाटा हनुमान मंदिर, ११ वाजता चांगदेव येथील जोग महाराज | आश्रमात येईल. येथे विसावा व भोजन होईल. दुपारी १ वाजता तापीपूर्णा संगम, चांगदेव मंदिर, संत निवृत्तीनाथ मंदिर, सोमेश्वर मंदिर, सिद्धेश्वर दर्शन घेऊन नावेने दुपारी २ वाजता मेळसांगवे येथे पोहोचेल. पंचाने, शेमळदे फाटा मार्गे ५ वाजेपर्यंत मुक्कामी उचंदेत पोहोचतील.
२४ जानेवारी : दुसऱ्या दिवशी मंगळवारी सकाळी ७ वाजता उचंदे येथून परिक्रमेचे पुढील प्रवासासाठी प्रस्थान होईल. ८ वाजता पूर्णाड येथे चहापान, ९ वाजता खामखेडा भवानी मंदिरावर नाश्ता, दुपारी १२ वाजता पिंप्री अकाराउत येथे भोजन व विसावा, ३ वाजता सातोड देवटेकडी, नंतर सायंकाळी ५ वाजेपर्यंत निमखेडी खुर्द गाठून तेथे दुसरा मुक्काम होईल.
२५ जानेवारी : तिसऱ्या दिवशी बुधवारी सकाळी ७ वाजता निमखेडी खुर्द येथून प्रस्थान, १० वाजता हरताळे श्रावणबाळ समाधी मंदिर, साई मंदिर दर्शन व कीर्तन, दुपारी २ वाजता वढवे फाटा, सायंकाळी ४ वाजता संत मुक्ताईंच्या जुन्या मंदिरात आगमन होईल. यानंतर परिक्रमेचा समारोप असा क्रम असणार आहे.