तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा,तरी माझ्या दैवा पार नाही !
“मुक्ताई सेवेकरी” उपक्रम राबविल्याबद्दल सत्कार !
श्रीक्षेत्र संत मुक्ताईनगर : येथे विजया एकादशी व महाशिवरात्री पर्वावर आदिशक्ती मुक्ताई – चांगदेव माघवारी यात्रोत्सव 2023 मोठया उत्साहात पार पडला. कोरोना संकट काळानंतर यंदाचा यात्रोत्सव गर्दीचा उच्चांक देणारा ठरला , मात्र संत संस्थान व सेवाभावी सामाजिक संस्थांच्या सुनियोजनाने भाविक व वारकऱ्यांना आदिशक्ती मुक्ताई साहेबांचे मन भरून व शांततेत दर्शन घेता आले. त्यामुळे “तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा,तरी माझ्या दैवा पार नाही !” या उक्तीप्रमाणे आदिशक्ती मुक्ताईच्या दरबारात ८४४ सेवकांनी तन मनाने सेवा रुजू करून संत सेवेचा लाभ घेतला. यासाठी “मुक्ताईनगर सिव्हील सोसायटी” या सेवा भावी संस्थेने मुक्ताई सेवेकरी उपक्रम यशस्वी रित्या राबविल्या बद्दल सर्वांचा यथोचित सत्कार संस्थानचे अध्यक्ष भैय्यासाहेब ॲड. रविंद्र पाटील यांच्या वतीने करण्यात आला.
आई मुक्ताईच्या यात्रा महोत्सवामध्ये संत मुक्ताई संस्थानचे अध्यक्ष भैय्यासाहेब ॲड. रवींद्र पाटील यांच्या परवानगीने मुक्ताईनगर सिव्हील सोसायटी तर्फे प्रथमच परिसरातील मंडळींना आवाहन करुन जवळपास 844 सेवकांची नोंदणी करत दर्शनासाठी येणाऱ्या वारकऱ्यांना पाणपोई, दर्शन बारी, चहापान, बूट चप्पल संकलन वितरण असे विविध सेवाउपक्रम राबवून सुविधा पुरवण्याचे कार्य अतिशय सुनियोजीत पद्धतीने केल्या बद्दल तसेच “मुक्ताईचा सेवेकरी” हा सेवा भाव जनमनात श्रद्धा व जबाबदारी असल्याची जाणीव करून ही सेवा यशस्वी करून घेतली. त्यामुळे आदिशक्ती मुक्ताई साहेबांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेल्या भूमीत संत सेवेचे महत्व भविष्यात जास्तीत जास्त रुजविण्याचे ध्येय मुक्ताईनगर सिव्हिल सोसायटी असून अशा प्रकारे अनेक प्रकारचे सेवा कार्य त्यांच्या द्वारा होत आहे. त्याबद्दल संस्थानचे अध्यक्ष ॲड. रवींद्र पाटील यांनी सोसायटीच्या सर्व सदस्यांसह स्नेहभोजन करून आई मुक्ताई च्या साक्षीने समाधी स्थळ (कोथळी) मुक्ताईनगर येथे दरबारात मुक्ताईनगर सिव्हिल सोसायटीचा सर्व सदस्यांचा आदिशक्ती श्री संत मुक्ताई साहेबांचा प्रतिमाफोटो व पुष्पगुछ देऊन सामूहिकरित्या सत्कार केला.यावेळी मंदिराचे व्यवस्थापक उद्धव जुनारे महाराज व सर्व सिव्हील सोसायटी चे सदस्य उपस्थित होते.
मुक्ताईनगर सिव्हील सोसायटी द्वारे विविध प्रकारचे सेवाकार्य सुचारू रूपाने राबविण्यात येतात. या सेवाकार्यामध्ये कार्यरत असणारा सदस्य वर्ग हा सेवेला आपला जीवनधर्म मानूनच कार्य करतो. या सर्व कार्याचा प्राण म्हणजे सेवावृत्तीने कार्यरत असलेले एकीचेत हात. केवळ भक्तिभावाने काम करणारे, कोणत्याही मोबदल्याची अपेक्षा न धरता कार्यरत असणारे सर्व सदस्य इथे कार्यरत असतात. यात महिलांचाही समावेश असतो.
मोबदला मिळतोय म्हणून सेवा करण्याची कुणाचीही भावना नाही. या सेवेकऱ्यांचे वर्णन संतांच्या वाणीत करता येईल. ‘‘भूक भाकरीची, छाया झोपडीची, निवाऱ्यास द्यावी ऊब गोधडीची, मायामोह सारे उगाळून प्यालो, मागणे न काही मागण्यास आलो……‘‘ |
‘‘पैशाबरोबर अधिकार येतो, कर्तव्याचा मात्र विसर, सेवेत कर्तव्याचे पालन होवून उत्कर्ष होतो, याचा अर्थ ,
चांगल्या, निरपेक्ष वृत्तीनं, सेवाभावानं देखील या जगात वावरता येतं हेच त्यांना सुचवायचं आहे . इतकी जागरूकता, प्रेम आणि आदर बाळगणारा हा सेवाभावी वर्ग पाहिला की मन आश्चर्यचकित होतं.