तहसिलदारांचे वाहन अपघात ग्रस्तांच्या मदतीसाठी धावले !
मुक्ताईनगर येथे आमदारांनंतर महसूल विभागाकडून माणुसकीचे दर्शन …
संत मुक्ताईनगर : प्रशासकीय कामकाज आटपून मुक्ताईनगर तहसिल कार्यालयाचे वाहन मुक्ताईनगरकडे परतत असताना त्यांना इंदौर – छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) महामार्गावर माळेगाव ता. मुक्ताईनगर फाट्याजवळ एका दुचाकीला दुसऱ्या दुचाकीने धडक दिली. यात दोघे महिला गंभीर जखमी झालेल्या दिसून आल्या यावेळी तहसीलदार श्वेता संचेती यांनी लागलीच वाहन थांबवून जखमींना स्वतः च्या शासकीय वाहनात टाकून पुढील उपचारार्थ खासगी रुग्णालयात दाखल केले. दोन दिवसांपूर्वीच आमदार चंद्रकांत पाटील यांनी देखील याच मार्गावरील अपघात ग्रस्तांना स्वतः च्या वाहनातून पाठविले होते. हाच आदर्श आज तहसीलदारांनी अवलंबिल्याने माणुसकी जोपासणारी प्रवृत्ती वाढीस लागून अशा कृतीतून पुढे येत असल्याचे दिसून येत आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, माळेगाव ता.मुक्ताईनगर येथील रहिवासी आशाबाई गजानन पाटील ही महीला मुलाच्या दुचाकीवर त्यांच्या नणंदे सोबत असे तिघे मुक्ताईनगर येथील प्रसिद्ध हृदय रोगतज्ज्ञ डॉ.एन जी मराठे यांचे कडे रूटीन चेकअप साठी येत होते. दुचाकी रस्त्याने चालत निघालेली होती अशात मागून एका दुसऱ्या भरधाव दुचाकीने त्यांना धडक दिली यात आशाबाई व त्यांच्या नणंद या दुचाकी वरून फेकल्या गेल्या जावून गंभीर जखमी झाल्या त्यामुळे महामार्गावर अपघात झाल्याने बघ्यांची प्रचंड गर्दी झाली परंतु संबंधित अपघात ग्रस्तांना मदती साठी कोणीच पुढे येत नव्हते. अशात प्रशासकीय कामकाज आटपून मुक्ताईनगर तहसिल कार्यालयाचे वाहन मुक्ताईनगरकडे परतत असताना वाहनात बसलेले तहसीलदार श्वेता संचेती, पर्यीविक्षाधिन तहसीलदार संदीप माकोडे, निवडणूक शाखा नायब तहसीलदार प्रदीप झांबरे यांनी लागलीच निर्णय घेत जखमींना शासकिय वाहनात बसवून घेतले व तातडीने मुक्ताईनगर येथील डॉ मराठे यांच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. लागलीच येथे प्राथमिक करून त्यांना पुढील उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले.