जळगांव जिल्ह्यातील प्रसिद्ध संत मुक्ताई समाधी स्थळी २६ नोव्हेंबर रोजी होणारं भव्य तुलसी विवाह सोहळा !
तिर्थक्षेत्र संत मुक्ताईनगर येथील आदिशक्ती श्री संत मुक्ताई समाधी स्थळ (कोथळी) येथील जुने मंदिरात रविवार, ता.२६ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता गोरज मुहूर्तावर भव्य तुलसी विवाह महासोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. हिंदू धर्मात तुळशीला पापनाशिनी म्हणून अनन्यसाधारण महत्त्व आहे. तुळस ही भारताच्या सर्व प्रांतांत व सर्व भागांत उगवणारी वनस्पती आहे.
बहुतेक हिंदू कुटुंबांच्या घराचे अंगणात तुळशी वृंदावन असते. शालिग्राम रुपात विष्णूचा तुळशीशी विवाह लावण्याचा पूजोत्सव कार्तिक द्वादशीपासून पौणिमेपर्यंत एखाद्या दिवशी संध्याकाळी करतात, पण मुख्यतः द्वादशीला करतात. तुलसी विवाह हे एक व्रत मानले गेले आहे. हे व्रत केल्याने करणाऱ्याला कन्यादानाचे फळ मिळते असे मानले जाते. ही संस्कृती आजच्या धकाधकीच्या युगात काहीशी लोप पावत असल्याने ही संस्कृती व परंपरा जोपासली जावी व सर्वांना या उत्सवातून प्रेरणा मिळावी या हेतूने संत मुक्ताई संस्थान तर्फे या भव्य दिव्य सोहळ्याचे आयोजन करण्यात आलेले असून सर्वांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहावे असे आवाहन
संत मुक्ताई संस्थान चे अध्यक्ष ॲड रविंद्र भैय्यासाहेब पाटील, संत मुक्ताई पालखी सोहळा प्रमुख रविंद्र हरणे महाराज, संत मुक्ताई मंदिर व्यवस्थापक उध्दव जूनारे महाराज, संत मुक्ताई संस्थान चे मॅनेजर विनायक हरणे महाराज तसेच संस्थान च्या फडावरील तमाम कीर्तनकार , कथाकार, वारकरी , टाळकरी व फडकरी मंडळींनी केलेले आहे.