आमदार चंद्रकांत पाटलांच्या सूचनेनुसार,मुक्ताईनगर मतदार संघात भरणार विविध कल्याणकारी शासकीय योजनांची जत्रा
मुक्ताईनगर : मतदार संघातील रावेर, बोदवड व मुक्ताईनगर जनतेला जनतेला शासनाच्या विवीध कल्याणकारी योजनांचा लाभ घेता यावा म्हणून “जत्रा शासकीय योजनांची, सर्व सामान्यांच्या विकासाची” हा उपक्रम तालुका स्तरावर विभागवाईज राबवावा अशा सुचनांचे पत्र आ.चंद्रकांत पाटील यांनी तिघेही तालुक्यांच्या तहसिलदारांना दिले आहे. त्यामुळे आता मुक्ताईनगर मतदार संघात लवकरच शासकीय योजनांची जत्रा भरणार आहे हे स्पष्ट झाले आहे.
आमदार पाटील यांनी दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, राज्य शासनाने नागरिकांच्या आर्थिक आणि सामाजिक कल्याण व सुरक्षेला प्राधान्य देण्याच्या हेतूने राबविण्यात येणाऱ्या विविध कल्याणकारी योजनाचा लाभ एकाच छताखाली देण्याच्या शुद्ध हेतूने शासन निर्णय क्रमांक संकीर्ण २०२३/प्र.क्र.०५/- १४१४ मुंबई दि. १३ एप्रिल २०२३ अन्वये “जत्रा शासकीय योजनांची, सर्व सामान्यांच्या विकासाची हा उपक्रम राबविण्याचे अपेक्षित आहे.
त्यामुळे रावेर,बोदवड व मुक्ताईनगर तालुक्यातील नागरिकांना सोयीस्कर होईल अशा स्वरूपात विविध ठिकाणी “जत्रा शासकीय योजनांची,सर्व सामान्यांच्या विकासाची” हा उपक्रम राबविणे कामी विभागानुसार कृती आराखडा तयार करून मला अवगत करण्यात यावे असे पत्रात म्हटले आहे.