आता फोनवर हॅलो ऐवजी “वंदे मातरम्” !
शासकिय कार्यालयांकरीता शासन निर्णय जाहिर !!
मुंबई : शासकीय कामानिमित्त दुरध्वनी किंवा भ्रमणध्वनीव्दारे संभाषणा दरम्यान अभिवादन करताना “हॅलो” ऐवजी “वन्दे मातरम्” या शब्दाचा ऐच्छिक वापर करणेबाबत राज्य शासनाने महसूल व वन विभागाचा दि. २५ ऑगस्ट, २०२२ रोजी शासन निर्णय जाहीर केला असून आता शासकीय कार्यालयात हॅलो ऐवजी वंदे मातरम् चा रिप्लाय मिळणार आहे शिंदे फडणवीस सरकार स्थापन झाल्यानंतर मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केलेल्या घोषणे नुसार आज हा अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी सर्वात मोठा निर्णय घेण्यात आल्याने स्वातंत्र्यासाठी हसत हसत प्राणांची आहुती देणाऱ्या क्रांती कारकांचा हा एक प्रकारे आपला देश स्वातंत्र्याच्या (७५ वर्ष) अमृत महोत्सवी वर्षानिमित्त मानवंदना दिल्याचे बोलले जात आहे.
आज जाहीर झालेला शासन निर्णय क्रमांक : संकीर्ण-२०२२/प्र.क्र. ९८/फ-५ दिनांक : २५ ऑगस्ट, २०२२ नुसार त्यात म्हटले आहे की,
“वन विभागातील सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी शासकीय कामानिमित्त जनता किंवा लोकप्रतिनिधी यांच्याशी दुरध्वनी किंवा भ्रमणध्वनीव्दारे संभाषणा दरम्यान अभिवादन करताना “हॅलो” ऐवजी “वन्दे मातरम्” या शब्दाचा वापर करावा, असे आवाहन करण्यात येत आहे.”
सदर शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले असून त्याचा संगणक सांकेतांक क्रमांक २०२२०८२५११३९५६५३१९ असा आहे.
सदर शासन परिपत्रक उप सचिव (वने) महसूल व वन विभाग (भा. ना. पिंगळे) यांच्या डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकीत करून काढण्यात आला आहे.
