अफवेने धरला जोर : दुग्ध पशुंवर लंपी आजाराचे सावटाने दूध, चहा न पिण्याचा केला जातोय अपप्रचार !
तालुका पशू वैद्यकीय अधिकाऱ्यांनी अफवांना बळी न पडण्याचे केले आवाहन !!
मुक्ताईनगर : शेतकऱ्यांचे जोड धंदा असलेल्या दुग्ध व्यवसायास पूरक ठरणाऱ्या पशू धनावर सद्या लंपी आजाराचे सावट असून काही जनावरे दगावली आहेत तर काहींवर मोठी लसीकरणाची मोहीम पशुवैद्यकीय विभागातर्फे सुरू असून यासाठी आता स्थानिक ग्राम पंचायती यांनी देखील पुढाकार घेवून लंपी आजाराचे समूळ उच्चाटनासाठी मोफत लसीकरण मोहीम राबविली जात आहे. वास्तविक पाहता लंपी आजाराचा प्रादुर्भाव हा (गाई) गो वंश जातीच्या पशूंवर मोठ्या प्रमाणावर आहे. इतर प्राण्यांवर जास्त प्रादुर्भाव नाही. परंतु काही खोडसाळ लोकांकडून अफवेचे पेव उठवले जात असून नव्हे नव्हे प्रत्यक्ष फोन करून , तोंडी प्रचार करून दूध, चहा व दुग्ध जन्य पदार्थ न खाण्याचा पिण्याचा सल्ला दिला जात वास्तविक पाहता या तर्काला कुठलाही वैज्ञानिक आधार नाही. तरीही या अप प्रचाराचा फटका मात्र दुग्ध व्यवसायाला बसून सर्वात मोठे नुकसान हे शेतकरी राजाचे होणार असून जोडधंदा असणारा हा व्यवसाय देखील संकटात आला असून यामुळे केवळ शेतकरी राजाचं प्रभावित होणार नसून डेअरी, हॉटेल, चहा टपऱ्या, मिठाई चे दुकान आदी व्यवसाय संकटात सापडू शकतात. यासाठी पशू वैद्यकीय विभाग व संबंधित विभागाने पुढे येवून असल्या अफवा निरर्थक असल्याचे सिद्ध करून जनतेत जनजागृती निर्माण करण्याची गरज निर्माण झालेली आहे.
अफवांवर विश्वास ठेवू नये – तालुका पशू वैद्यकीय अधिकारी अभय डूखरेकर :
लंपी आजाराने दूध प्रभावित होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. सद्या या आजाराचे कारण पुढे करून सुरू असलेल्या अफवा या निरर्थक व खोडसाळ वृत्तीच्या आहेत. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन तालुका पशू वैद्यकीय अधिकारी अभय डूखरेकर यांनी केले आहे.