सुख हे एकमेव संतांच्या मार्गदर्शनातच मिळते : ह. भ. प. विठ्ठल (दादा) महाराज
ह. भ. प. विठ्ठल (दादा) महाराज हे पंढरपूर येथील वासकर फडाचे गादिपती असून सेवा निवृत्त न्यायाधीश आहेत.
मुक्ताईनगर : पंढरपूर येथील वासकर फडाचे गादिपती गुरुवर्य ह. भ. प. विठ्ठल (दादा) महाराज यांची द्वितीय दिवसाची कीर्तन सेवा गुरुवारी दि.२९ डिसेंबर २०२२ रोजी पार पडली. ते सेवानिवृत्त न्यायाधीश असून मुक्ताईनगर येथील तिर्थक्षेत्र संत मुक्ताई देवस्थान येथे श्री सद्गुरू धुंडा महाराज देगलूकर सेवा समिती,पंढरपूर व श्री संत मुक्ताई संस्थान मुक्ताईनगर समाधीस्थळ द्वारा आयोजित ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण – निरूपण व भव्य कीर्तन महोत्सवामध्ये ही किर्तन सेवा पार पडली.
सुख एके हेची ठाई | बहु पायी संतांचिये ||१||
म्हणवोनी केला वास | नाही नाश ते ठाया ||२||
न करवे हालचाली | निवारली चिंता हे ||३||
तुका म्हणे निवे तनु | रज:कणु लागता ||४||
या जगतगुरू संत तुकाराम महाराज यांच्या चार चरणांच्या सुंदर अभंगावर अभ्यास पूर्ण चिंतन मांडतांना त्यांनी आपल्या अमृततुल्य वाणीतून वाक पुष्पाद्वारे संत ज्ञानेश्वर माऊलींच्या अनेक दृष्टांतांच्या माध्यमांतून अभंगाच्या प्रत्येक चरणांची उकल केली. आणि अनेक विषय आहेत ते तात्पुरते सुख देणारे असून अशा सुखाचा काय लाभ तर त्यात सुख मानण्यापेक्षा संतांनी जो सुखाचा मार्ग दाखविला त्याच मार्गावरून अध्यात्मिक मार्गक्रमण करून खऱ्या अर्थाने ईश्वर प्राप्तीची अनुभूती घ्यावी असे अनेक उदाहरणे व दाखल्यांच्या माध्यमातून अभंगांची पूर्ण उकल करून सांगितले.
किर्तन सुरू असताना महाराजांना आले गहिवरून –
“किर्तन सेवा सुरू झाल्यावर परिहार देत असताना ह. भ. प. विठ्ठल (दादा) महाराज यांनी आज माझ्यासाठी खूप भाग्याचा दिवस असून ज्या ज्ञानेश्र्वर माउलींना जगाचा संताप आल्यावर त्यांना अधिकार पदाने बोध देणाऱ्या साक्षात मुक्ताई च्या समाधीस्थळी दरबारात येण्याचा योग आला यासाठी कार्यक्रमाचे आयोजकांचे आभार मानत असताना आनंदाश्रुन्नी प्रचंड गहिवरून आले. यावेळी हजारो श्रोत्यांचे डोळे देखील चटकन पाणावले.
फड परंपरेनुसार किर्तनाची अद्भुत सांगता झालेनंतर ह. भ. प. विठ्ठल (दादा) महाराज यांचा संत मुक्ताबाई संस्थान चे अध्यक्ष ॲड.रवींद्र पाटील, चैतन्य महाराज देगलूरकर, संत मुक्ताई पालखी सोहळा प्रमुख रवींद्र हरणे महाराज सत्कार केला.यावेळी संत मुक्ताईचे विश्वस्त तसेच फडावरील सर्व किर्तनकार, टाळकरी फडकरी उपस्थित होते.