संत परंपरा व वारकरी संप्रदायाच्या भावना दुखावल्या प्रकरणी सुषमा अंधारे यांच्यावर कठोर कारवाई करून गुन्हा दाखल करावा – किर्तनकार दुर्गा संतोष मराठे
मुक्ताईनगर : वारकरी संप्रदाय व हिंदू धर्म याविषयी संताप जनक व आक्षेपार्ह वक्तव्य करुन श्रीमती सुषमा अंधारे या भाडोत्री वाचाळ वक्त्या यांनी संत परंपरेवर केलेल्या उपहासात्मक व संतापजनक टीका टिपण्णी प्रकरणी त्यांचेवर तात्काळ गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करण्यात यावी अशा मागणीचे निवेदन तिर्थक्षेत्र मुक्ताईनगर येथील किर्तनकार सौ.दुर्गा संतोष मराठे यांनी मुक्ताईनगर पोलिसांना दिले आहे.
त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, वारकरी संप्रदाय व हिंदू धर्म द्वेष्ट्या श्रीमती सुषमा अंधारे या भाडोत्री वाचाळ वक्त्या असून यांचे काही व्हिडीओ समाज माध्यमात दिसून येत आहे. यातून त्या जगाला सहिष्णूतेचा ,अध्यात्माचा श्रेष्ठ मार्ग दाखविणाऱ्या संतांच्या मांदियाळीतील थोर संत मंडळी जगत वंदनीय संत ज्ञानेश्वर महाराज, संत एकनाथ महाराज व इतर संत यांच्या विषयी उपहासात्मक संताप जनक असे वक्तव्य त्यांनी केलेले आहे. यातून संत मंडळी यांच्या विषयी सहेतुक टीकात्मक विडंबन केलेले दिसून येत असून त्यांनी आपले उपास्य दैवत प्रभू रामचंद आणि भगवान श्रीकृष्ण यांच्यावर देखील टीका केलेली आहे. आपला महाराष्ट्र संतांची भूमी म्हणून ओळखला जातो. येथे संतांचे विचार आणि अभंग यातून डोळस भक्ती जनमानसात रुजत असतांना समाज मनावर प्रबोधनाचे कार्य वारकरी संप्रद्यातून होत असताना संत व त्यांच्या विचारांनी सहिष्णू व निर्व्यसनी समाज घडत असतांना अशा आदर्श विचारवंत संतांची शिदोरी आजही आपले निस्वार्थी कार्य करीत आहे. येथे शेकडो वर्षांची परंपरा हि केवळ संत विचारांची द्योतक आहे. सदर महिलेच्या वक्तव्याने समस्त वारकरी संप्रदायाच्या संताच्या आचार विचार आणि उच्चाराचा पाईक असणाऱ्या आम्हा सर्व वारकरी मंडळींच्या भावना दुखावलेल्या असून सुसंकृत पणाचा आव आणणाऱ्या अशा बौद्धिक दिवाळखोरी असणाऱ्या काही व्यक्ती बेताल वक्तव्य करून समाज मनात चिड निर्माण करीत आहे. यांचेवर पायबंद घालण्यात यावा. तसेच या वाचाळ भाडोत्री महिलेवर तात्काळ कठोर कारवाई करून त्यांचेवर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी निवेदनात करण्यात आलेली आहे.