संत ज्ञानेश्वरादी संताची खिल्ली उडविल्याने सुषमा अंधारे विरोधात मुक्ताईनगरात होणार प्रचंड आंदोलन
आमदार चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली बाळासाहेबांची शिवसेना, हिंदुत्ववादी संघटना तसेच असंख्य वारकरी होणार आंदोलनात सहभागी
मुक्ताईनगर : वारकरी शिरोमणी संत ज्ञानेश्वर माउली यांच्यासह संत परंपरेतील अध्यात्माची खिल्ली उडवून संतांविषयी विषयी संताप जनक व आक्षेपार्ह वक्तव्य केल्या प्रकरणी सुषमा अंधारे यांच्या निषेधार्थ आमदार चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली बाळासाहेबांची शिवसेना पक्षातर्फे तसेच विविध हिंदुत्ववादी संघटना, असंख्य वारकरी मुक्ताईनगर येथील प्रवर्तन चौकात उद्या १५ डिसेंबर २०२२ रोजी गुरुवारी स.११ वाजता प्रचंड आंदोलन करण्यात येणार असून हिंदू संस्कृती व वारकरी संप्रदाय या विषयी हिंदू अस्मिता दाखवून वाचाळ महिलेवर कारवाई ची मागणी करण्यात येणार आहे. या संदर्भात तहसिलदार तसेच पोलिस निरीक्षकांना निवेदन देण्यात आले.
निवेदन देतेवेळी तालुका प्रमुख छोटू भोई, इल्हा संघटक अफसर खान,युवा सेना जिल्हा प्रमुख पंकज राणे, शहर प्रमुख गणेश टोंगे , उप तालुका प्रमुख प्रफुल्ल पाटील, विभाग प्रमुख महेंद्र मोंढाळे(कोळी), शहर संघटक वसंत भलभले , माजी युवा सेना तालुका प्रमुख सचिन(पिंटू) पाटील , सोशल मिडीया प्रमुख शिवराज पाटील ,नगरसेवक युनूस खान यांच्यासह इतर असंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, गेल्या काही दिवसांपासून हिंदू धर्म व संस्कृतीबद्दल गरळ ओकणाऱ्या एका पक्षाच्या प्रवक्त्या श्रीमती सुषमा अंधारे यांनी दोन समाजात तेढ निर्माण होईल असे वक्तव्य केल्याने म. जिल्हाधिकारी, जळगाव यांचेतर्फे त्यांचेवर भाषण बंदीची कारवाई करण्यात आली होती. परंतु आता पुन्हा या वाचाळ महिलेने वारकरी संप्रदयाचे शिरोमणी असलेले संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या विषयी तसेच इतर संतांविषयी चुकीच्या पद्धतीने वक्तव्य करून तमाम वारकरी संप्रदाय तसेच हिंदू मनाच्या भावना दुखावल्या असून अशा वाचाळ महिला वक्त्या श्रीमती सुषमा अंधारे यांचा आदिशक्ती श्री. संत मुक्ताबाई यांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेल्या संत भूमी तिर्थक्षेत्र मुक्ताईनगर येथे तीव्र निषेध करण्यात येत असून बाळासाहेबांची शिवसेना पक्षातर्फे या मुक्ताईनगर येथे उद्या दि.१५.१२.२०२२ रोजी गुरुवारी ठीक स. ११ वाजता प्रवर्तन चौकात प्रचंड आंदोलन करण्यात येणार आहे याची नोंद घ्यावी असा इशारा निवेदनात देण्यात आला आहे.