संतांचे जगावर भले मोठे उपकार – ह भ प रवींद हरणे महाराज
मुक्ताईनगर :
नमो ज्ञानेश्र्वरा नमो ज्ञानेश्र्वरा | निवृत्ती उदारा सोपान देवा ॥१॥
मुक्ताबाई नमो त्रिभुवनपावनी | आद्यत्रय जननी देवांचिये ॥2॥
जगदोध्दारालागीं धरिले अवतार | मिरविला बडिवार सिध्दाईचा ॥3॥
निळा शरणागत म्हणावी आपुला | संतीं निरविला देऊनि हांती ॥4॥
या अभंगाच्या माध्यमातून ह भ प रवींद महाराज हरणे यांनी
आपल्या अमृततुल्य वाणीतून वाक पुष्पा च्या माध्यमांतून निरूपण केले. त्यांची आज श्री सद्गुरू धुंडामहाराज देगलूकर सेवा समिती,पंढरपूर व श्री संत मुक्ताई संस्थान मुक्ताईनगर समाधीस्थळ द्वारा आयोजित ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण – निरूपण व भव्य कीर्तन महोत्सव या भव्य दिव्य आयोजित कार्यक्रमात पहिल्या दिवसाच्या कीर्तन सेवेच्या माध्यमातून त्यांनी आदिशक्ती मुक्ताई सह चारही भावंडांनी जगावर उपकार केल्याचे सांगितले.
पुढे त्यांनी आपल्या वाक पुष्पातून निरूपण केले की, महाराष्ट्रातील एक प्रमुख संत धाम असलेले आदिशक्ती मुक्ताई चं हे स्थान आहे. चारही भावंडांच्या समाधी सोहळ्याच्या सप्तशतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित हा कळस सप्ताह येथे सुरू असल्याचे नमूद केले. तसेच “वाचावी ज्ञानेश्वरी” या विषयावर प्रवचन व निरूपण श्री चैतन्यजी महाराज देगळूकर यांच्या अमृततुल्य वाणीतून होत असल्याने ज्ञानेश्वरी का वाचावी याचे गूढ ज्ञान ,गुण, महत्त्व अध्यात्मातील गुणवत्ता , श्रेष्ठता श्रोत्यांना कळणार आहे.त्यामुळे येथे
पुण्य फळले बहुता दिवसा । भाग्य उदयाचा ठसा ॥ झालो सन्मुख तो कैसा । संत चरण पावलो ॥ अशी अनुभूती सर्वांना होणार असल्याचे व हे सर्व मुक्ताई कृपेने होत असल्याचेही त्यांनी नमूद केले. यानंतर त्यांनी अभंगांच्या चारही चरणांच्या माध्यमातून संत निवृत्ती, ज्ञानेश्वर , सोपान आणि मुक्ताई या संतांनी जगावर उपकार करून जग कल्याण कशा प्रकारे केले याबद्दल दृष्टातांच्याद्वारे श्रोत्यांना सांगितले.तसेच जोपर्यंत आपण शाबूत आहोत म्हणजेच इंद्रिय, हात पाय कान नाक डोळे आहेत तोपर्यंत ज्ञानेश्वरी वाचावी म्हणजेच वाचावी ज्ञानेश्वरी व एक तरी ओवी अनुभवावी असे सांगितले.
तसेच संतांनी जो मार्ग दाखविला आहे. त्याचे अनुकरण आजही काही ज्येष्ठ मंडळी करून वारकरी संप्रदायातील नवख्या मंडळींना भक्तीचा खडतर मार्ग स्वतः अनुकरण करून दाखवीत आहेत. म्हणजे येथे जे जे वडील करिती… या कृतीतून वारकरी संप्रदायाची परंपरा जोपासण्याचा मार्ग दाखवीत आहेत.
संत ज्ञानदेव, नामदेव, चांगदेव, विसोबा खेचर आदी संत मंडळींना बोधाचे ज्ञान देणाऱ्या मुक्ताबाई विषयी वरील संत मंडळी सह संत जनाबाई , संत निळोबा यांनी त्या आदिशक्ती असल्याचे अभंगांमधून नमूद केल्याचेही त्यांनी सांगितले. “ज्ञानदेव म्हणे भली मुक्ताबाई, दाखविली सोय आम्हा लागी” या अभंगांचा दाखला देत आदिशक्ती मुक्ताबाई यांचे वय जरी लहान असले तरी त्यांचा अधिकार आणि त्यांचे संत वाड•मयात खूप मोठे स्थान असल्याचे त्यांनी नमूद केले.