श्री संत मुक्ताई (समाधीस्थळ) मंदिर बांधकामाचा आमदार चंद्रकांत पाटील यांनी घेतला आढावा !
मुक्ताईनगर : महाशिवरात्री पार्श्वभूमीवर आदिशक्ती मुक्ताई साहेबांचा भव्य यात्रोत्सव असल्याने येथील रखडलेल्या कामाचा आढावा आमदार चंद्रकांत पाटील यांनी घेतला. यात्रोत्सवात लाखो भाविक वारकरी शेकडो दिंडी सोहळा येथे येत असल्याने भाविकांना कुठलाही त्रास होऊ नये यासाठी रखडलेल्या कामाला गती देण्याचा सूचना सार्वजनिक विभागाच्या अधिकाऱ्यांना याप्रसंगी देण्यात आल्या आहेत.
मुक्ताईनगर येथील श्री संत मुक्ताई समाधी स्थळ जुनी कोथळी मंदिराचा शासनाच्या निधीतून जीर्णोद्धार सुरू असून निधी अभावी, तसेच कोरोना प्रतिबंधात्मक परिस्थितीने मंदिराचे बांधकाम गेल्या २ ते ३ वर्षांपासून रखडलेले होते. आमदार चंद्रकांत पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस , ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांचेकडे पाठपुरावा करून रखडलेल्या कामासाठी २.५० कोटी रु. निधी उपलब्ध केला. यानुसार सार्वजनिक बांधकाम विभागाकडे निधी प्राप्त होताच आमदार चंद्रकांत पाटील यांनी सार्वजनिक विभागाचे अधिकारी यांचेसह मंदिर परिसरात रखडलेल्या बांधकामाची पाहणी करून यात्रोत्सव पार्श्वभूमीवर जलद गतीने गाभाऱ्यातील उर्वरित काम करण्याच्या सूचना केल्या तसेच मंदिराच्या आतील भागात पेव्हर ब्लॉक बसविणे. सांड पाणी काही ठिकाणी साचात असल्याने या पाण्याची विल्हेवाट लावून येथे प्लॅम्बिंगची कामे करणे व इतर उर्वरित कामा संदर्भात सूचना केल्या तसेच इतर कामासाठी लागणाऱ्या उर्वरित निधी साठी शासनाकडे पाठपुरावा सुरू असून जास्तीत जास्त निधी लवकरच प्राप्त होईल अशी माहिती आमदार चंद्रकांत पाटील यांनी दिली.

प्रसंगी सार्वजनिक बांधकाम विभागाचे उप अभियंता प्रवीण बेंडकुले, सहायक अभियंता डी एम पाटील, सच्चीतानंद शेजोळे, मंदीर बांधकाम कंत्राटदार लोणारी तसेच शिवसेना विभाग प्रमुख महेंद्र कोळी, उपतालुकाप्रमुख प्रफुल पाटील, युवा सेना जिल्हाप्रमुख पंकज राणे, उद्धव महाराज , ज्ञानेश्वर हरणे, गणेश पाटील , उमेश पाटील, युवराज कोळी, नितीन चव्हाण आदींची उपस्थिती होती.