वीज कोसळून मुक्ताईनगर तालुक्यातील तरुण जागीच ठार; अन्य दोघे जखमी
मुक्ताईनगर – जिल्ह्यात गेल्या अनेक दिवसांपासून मुसळधार पावसासह वीज कोसळण्याच्या घटना घटना घडत असून आज दुपारी दोन वाजेच्या सुमारास विजांच्या कडकडाटांसह पावसाला सुरुवात झाल्याने वीज अंगावर पडून एका शेतात काम करणाऱ्या शेत मजूर तरुणाचा जागीच मृत्यू झाल्याची दुदैवी घटना उचंदे शिवारात घडली असून अन्य दोन जण जखमी झाले आहेत. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. शत्रुघ्न काशिनाथ नमायते (वय ३५) असे मयत तरुणाचे नाव आहे.
याबाबत, शत्रुघ्न मायते हा आज दुपारी उचंदे शिवारातील माणिकराव पाटील यांच्या शेतात रोजंदारीने कामावर गेला असता त्यांच्या अंगाव वीज पडल्याने तो जागीच ठार झाला तर शेतमालक माणिकराव पाटील यांचा मुलगा गणेश पाटील व एक अन्य मजुर मुकेश पाटील हे दोघे भाजले गेले. संकेत पाटील व अमोल नमायते यांनी जखमींना तातडीने जळगाव येथे रुग्णालयात दाखल केले.
मयत शत्रुघ्नच्या पश्चात आई वडील, भाऊ, पत्नी, एक मुलगा भावेश वय १२, एक मुलगी वेदिका वय ६ असा परीवार असून कुटुंबातील कमवता प्रमुख गेल्याने कुटुंबावर प्रचंड आघात झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.