मुक्ताईनगर येथे पर्यावरण पूरक अंत्यसंस्काराने वेधले लक्ष
मुक्ताईनगरचे नगरसेवक संतोष कोळी यांनी वडिलांच्या पार्थिव अंत्यविधीतून दिला पर्यावरण संवर्धनाचा संदेश
मुक्ताईनगर : येथील नगरपंचायतीचे प्रभाग क्र.१ चे नगरसेवक संतोष उर्फ बबलू कोळी यांचे वडील स्व. प्रल्हाद पंढरीनाथ कोळी यांचे दि.२४ जून शुक्रवार रोजी पहाटे दुःखद निधन झाले. वृक्ष प्रेमी व निसर्ग वन प्रेमी असलेले नगरसेवक कोळी यांनी दुःखदायक व चिरंतन सत्य असणाऱ्या वडिलांच्या मृत्यूचे दुःख जरी असले तरी हिंदु धर्मात पार्थिवाला अग्नी डाग देणे पवित्र मानले जाते.परंतु अशा अंत्यविधीत लाकडांचा मोठ्याप्रणावर उपयोग होत असल्याने वन संपदेचे व पर्यायी निसर्गाचे नुकसान होऊन प्रदूषण ही होते. याच गोष्टीचे भान ठेवून त्यांनी पर्यावरण पूरक अंत्यविधी करण्याचे ठरवले आणि अमळनेर येथील जनसेवा फाऊंडेशन व अमळनेर गोशाळा यांच्या कडून पित्याचा अंत्यविधी पर्यावरण पूरक करून समाजासमोर एक आदर्श निर्माण केला आहे.

(फोटो – स्व. प्रल्हाद पंढरीनाथ कोळी)
पर्यावरण पूरक अंत्यविधी :
या पर्यावरण पूरक अंत्यसंस्कारात पार्थिव शरीराच्या दहनासाठी लाकडांचा अजिबात वापर केला जात नाही. त्याऐवजी गोशाळेत गायीच्या शेणापासून तयार झालेल्या मोठ्या आकाराच्या गोवऱ्या, गाईचे शुद्ध तूप, कापूर आणि चंदनाचा वापर केला जातो. स्मशानात चितेभोवती व स्मशानातील फाटकापर्यंत सुंदर रांगोळ्या स्मशानातील फाटकापर्यंत व मृत व्यक्तीच्या घराजवळ देखील रांगोळ्या काढल्या जातात. चिता आणि परिसर फुलांनी सजविण्यात येतो. या प्रकारच्या अंत्यसंस्कारात डिझेल, पेट्रोल, रॉकेल आणि लाकूड यांचा वापर करण्यात येत नाही. यावेळी एका व्यक्तीच्या अंत्यसंस्कारात किमान एका झाडाचे लाकूड वाचते असा या पर्यावरणपूरक अंत्यसंस्कार फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांनी माहिती दिली.

अमळनेर येथील महावीर युवा परिषद संचलितअमळनेर गोशाळा(पांजरा पोल) व जनसेवा फाउंडेशन या सामाजिक संस्थेने या विधीला २०१७ पासून सुरुवात केली आहे. या फाउंडेशनच्या २५ ते ३० वर्षांपासून गोशाळा असून या माध्यमातून फाउंडेशनचे अध्यक्ष, प्रा. अरुण कोचर यांनी ह्या पर्यावरण पूरक अंत्यसंस्कार विधीची कल्पना अंमलात आणली. या विधीत १२०० गोवरी, २ किंवा ५ किलो गाईचे तूप, १ किलो कापूर, खोबरे वाटी २ किलो, किंवा नारळ २५ नग, चंदनाचे छोटे लाकूड, फुलहार, रांगोळी आदींचा उपयोग केला जातो. गोवरी रचण्याचे काम जनसेवा फाउंडेशनचे कार्यकर्ते स्वतः करतात. या विधीसाठी कोणीही. कुठूनही कॉल केल्यास फाउंडेशनचे सदस्य सर्व ठिकाणी हजर होतात.
(यासाठी संपर्क क्र. 9075507420 )
पर्यावरणपूरक विधीची वैशिष्ट्ये…
■ पारंपरिक पद्धतीने स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यासाठी साधारणपणे ३५० ते ४०० किलो लाकडांचा वापर होतो. तथापि, पर्यावरण पूरक अंत्यसंस्कार विधीत चंदनाची काठी वगळता थोडेही लाकूड वापरले जात नाही.
■ या विधीमुळे प्रदूषणही कमी होते व लाकडाची मोठ्या प्रमाणात बचत होते.
■ पारंपरिक पद्धतीने एका मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यासाठी सुमारे ४ तास इतका कालावधी लागतो. तर पर्यावरण पूरक विधीमध्ये सुमारे दोन ते तीन तासात अंत्यसंस्कार होतात.
■ पारंपरिक पद्धतीपेक्षा पर्यावरण पूरक अंत्यसंस्कार विधीमध्ये धुराचे प्रमाण कमी होते.