प्रक्षाळ पुजेने संत मुक्ताई ७२६ व्या अंतर्धान सोहळ्याची सांगता,
भाविकांनी संत मुक्ताईच्या मूर्तीस लावले लिंबू , साखर
मुक्ताईनगर : आदिशक्ती संत मुक्ताई अंतर्धान समाधी सप्तशतकोत्तर रौप्य महोत्सवी(७२६ वे वर्ष) सोहळ्याची सांगता मंगळवारी सकाळी प्रक्षाळ पुजेने करण्यात आली. पौराहित्य विनायक महाराज व्यवहारे, राम जूनारे, उद्धव महाराज यांनी केले.
संत मुक्ताई अंतर्धान समाधी सोहळा नुकताच दि.१४ मे २०२३ रोजी पांडूरंग परमात्मा (पंढरपूर) , रुक्मिणी माता (कौडीण्यपुर) , संत नामदेव महाराज (पंढरपुर) , संत निवृत्तीदादा(त्र्यंबकेश्वर) पालखी सोहळे व जळगांव , धुळे , नाशिक ,बुलढाणा, अकोला तसेच विदर्भातील इतर असंख्य जिल्हे व मध्यप्रदेशातील असे लाखो भाविक व वारकऱ्यांचे
उपस्थितीत संपन्न झाला .तसेच ह्या वर्ष भरातील कालात हजारो लाखो भाविकांनी मुक्ताई चे दर्शन घेतले. महोत्सव दरम्यान आईसाहेबांचे नित्यउपचार बंद असतात. त्यामुळे वारी व उत्सव सोहळ्यानंतर प्रत्येक देवस्थान वर प्रक्षाळ पुजा केली जाते. यानुसार आदिशक्ती मुक्ताई ची प्रक्षाळपूजा संस्थान चे अध्यक्ष ॲड रविंद्रभैय्या पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आज करण्यात आली. यावेळी संपूर्ण गाभारा स्वच्छता करून , मंदिर पाणी अभिषेकाने स्वच्छ केले.तसेच आईचा क्षीणभाग जाण्याकरीता गरम पाणी, उटणे ,आयुर्वेदीक काढे, लोणी, दही, दूध, पाणी ,चंदन उटी, गुलाब जल वापरून स्नान घालण्यात आले. उपस्थित भाविकांनी मुक्ताई च्या मूर्तीस लिंबू , साखर लावण्यात आले. पंचामृताने पवमान सुक्त व मंत्रोच्चारात अभिषेक सोहळा पार पडला. तदनंतर आरती व महानैवेद्य देण्यात आला. या प्रक्षाळ पुजेनंतर आता आईसाहेबांचे दैनंदिन नित्यउपचार चालू होतील अशी माहिती ह भ प उध्दव महाराज जूनारे यांनी दिली.
यावेळी समाधी स्थळ – कोथळी मंदिर व्यवस्थापक ह.भ.प उध्दव महाराज जूनारे , ह.भ.प पंकज महाराज, ह.भ.प सौ दुर्गा संतोष मराठे, , ह.भ.प.रामेश्वर महाराज तिजारे , नगरसेवक तथा बांधकाम सभापती संतोष मराठे आदींसह असंख्य भाविकांची उपस्थिती होती.
*******************
प्रक्षाळ पूजेनंतर भाविकांसाठी महाप्रसाद :
प्रक्षाळ पूजेनंतर आदिशक्ति मुक्ताई साहेबांना नैवेद्य दिल्यानंतर भाविकांसाठी महाप्रसाद व्यवस्था करण्यात आली होती.