पंढरीश परमात्मा संत मुक्ताई भूमीतून भक्तांचा निरोप घेवून निघाले पंढरीला !
मुक्ताईनगर दि . १६ – श्री संत मुक्ताबाई यांच्या ७२६ व्या अंतर्धान समाधी सोहळ्यासाठी श्री क्षेत्र मुक्ताईनगरला आलेला श्री पंढरीचा राणा पांडुरंगराय आज ( मंगळवार ) द्वादश पारण्यानंतर भक्तांचा निरोप घेवून पंढरीला निघाला त्यावेळी हजारो भाविकांचे डोळे पानावले .
श्री संत मुक्ताबाई यांच्या ७२६ व्या अंतर्धान समाधी सोहळ्यासाठी श्री क्षेत्र पंढरपूरहून श्री पंढरीश पांडुरंगराय , संत शिरोमणी नामदेव महाराज , त्र्यंबकेश्वरहून श्री संत निवृत्तीनाथ , आळेफाटा येथून श्री संत रेडेश्वर महाराज यांच्यासह पांडुरंग पालखी सोहळा प्रमुख मेघराज वळखे पाटील , संत ज्ञानेश्वर महाराज संस्थानचे विश्वस्थ ॲड विकास ढगे पाटील , भागवत धर्म प्रसारक समितीचे अध्यक्ष सूर्यकांत भिसे आदी मान्यवरासह हजारो भाविक आले होते .
आज ( मंगळवार ) पहाटे संत मुक्ताबाई पालखी सोहळा प्रमुख ह भ प रवीन्द्र हरणे , विनायक हरणे , ज्ञानेश्वर हरणे यांच्या हस्ते सपत्नीक श्री पांडुरंगाची पूजा व अभिषेक करण्यात आला . जुन्या मुक्ताई मंदिरात संत नामदेव महाराजांचे वंशज ह भ प केशव महाराज नामदास यांचे काल्याचे कीर्तन झाले . द्वादश पारण्यानंतर दुपारी १२ वाजता श्री पंढरीश पांडुरंगराय व संत नामदेव महाराज यांचे पादुका पालखी सोहळे श्री क्षेत्र पंढरपूरकडे परतीच्या प्रवासास निघाले .
श्री पांडुरंगराय व संत नामदेव महाराज यांना निरोप देण्यासाठी संत मुक्ताबाई संस्थानचे अध्यक्ष ॲड रवींद्र पाटील , संदीप पाटील , रवींद्र महाराज हरणे , विनायक महाराज हरणे , ज्ञानेश्वर महाराज हरणे यांच्यासह असंख्य भाविक उपस्थित होते .