धर्मवीर आध्यात्मिक सेनेच्या प्रदेशाध्यक्ष पदी ह.भ.प.अक्षय महाराज भोसले यांची नियुक्ती
मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांनी दिली जबाबदारी
मुंबई: महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आध्यात्मिक क्षेत्रातील अडचणी व समस्यांचे निवारण करून भक्कम पाठबळ देण्याकरिता बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या वतीने धर्मवीर आध्यात्मिक सेनेची स्थापना करण्यात आली असून या सेनेच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी संत साहित्याचे अभ्यासक व वारकरी संप्रदायातील युवकांचे मार्गदर्शक ह.भ.प. अक्षय महाराज भोसले यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
वारकरी संप्रदायातील युवकांनी एकत्र येऊन युवकांच्या सर्वांगीण विकासाकरिता तथा संत साहित्य जगभरात प्रसारित व्हावे याकरिता वारकरी संप्रदाय युवा मंच या संघटनेची माध्यमातून ह.भ.प.अक्षय महाराज भोसले मागील अनेक वर्षांपासून कार्य करत आहेत. या संघटनेत वारकरी संप्रदायासाठी १५००० पेक्षा अधिक सुशिक्षित युवक काम करत आहेत. अक्षय महाराज भोसले हे वारकरी संत साहित्याचे अभ्यासातून समाज प्रबोधनपर कीर्तने, वारीतील वारकऱ्याची सेवा, वारकरी संप्रदायाचा प्रचार, समाजसेवा, व्यसनमुक्ती, अंधविश्वास दूर करणे, वारकरी संत साहित्यांचा जागर, मासिक वैष्णव दर्शन,वारी ऑन सोशल मिडिया, कीर्तनातून राष्ट्रीयत्वाची शिकवण, घरातून ग्रंथालयाची सुरुवात, दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदत, व्यसनमुक्तीसाठी कार्य, युवकांशी संवाद, कौशल्य विकास शिबीर,कोरोना मदतकार्य,स्त्री सक्षमासाठी कार्य,अनेक लेखांच्या माध्यमातून समाज माध्यमांवर पकड असलेले ह.भ.प.अक्षय महाराज सर्वश्रुत आहेत. गुरुवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत वर्षा बंगला या शासकीय निवासस्थानी अक्षयमहाराज भोसले यांना धर्मवीर अध्यात्मिक सेनेच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. मंत्री दादासाहेब भुसे , खासदार राहुल शेवाळे, पक्षाचे सचिव संजय मोरे सर, म्हस्के सर व पक्ष प्रवक्त्या शीतलताई म्हात्रे व पक्षातील ज्येष्ठ मान्यवर उपस्थित होते.