मुक्ताईनगर नगरपंचायतीचे कचऱ्याचे ट्रॅक्टर घुसले घरात !
मुक्ताईनगर नगरपंचायतीचे कचरा वाहून नेणारे विना क्रमांकाचे ट्रॅक्टर वरील चालकाचा ताबा सुटल्याने ट्रॅक्टर चक्क भुसावळ रोडवरील गजानन महाराज मंदिरासमोरील मुक्ताई झेरॉक्स दुकान यांचे घरामध्ये घुसल्याची घटना 26 जुलै रोजी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास घडली. सुदैवाने या घरात राहणारे वृद्ध दांपत्य नशीब बलवत्तर म्हणून अवघ्या काही वेळापूर्वीच घटनास्थळावरून थोडे लांब गेले होते अन्यथा येथे मोठी दुर्घटना घडली असती.
मुक्ताईनगर कोथळी रस्त्यावरील गजानन महाराज मंदिरासमोरील जुने मुक्ताबाई मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यावरील गटारीं मधील गाळ काढून तो गाळ नगरपंचायतीचे छोटे ट्रॅक्टर मध्ये ट्रॉली टाकून घेऊन जात असताना रस्त्याला थोडा चढती चा भाग असल्याने ट्रॅक्टर चालकांनी ट्रॅक्टर जोरात घेतले असावे ट्रॅक्टरचा पुढचा भाग रस्त्यावरून उंच होता. चढती रस्त्याचे वर वळण रस्ता असून त्या ठिकाणी वासुदेव चौधरी यांचे घर आहे. ट्रॅक्टर वरील चालकाचा तोल गेल्याने ट्रॅक्टर चौधरी यांचे तारेचे वॉल कंपाउंड ला छेदत त्यांचे घरामध्ये घुसले. सुदैवाने घटना घडली त्याच्या दहा मिनिटं आधी वासुदेव निवृत्ती चौधरी व त्यांच्या पत्नी दोघे दरवाजा जवळ खुर्चीवर बसलेले होते.
दरम्यान, मुक्ताईनगर नगरपंचायत स्वच्छता विभागाकडून कंत्राट घेतलेल्या मक्तेदाराकडून अनेक प्रताप केल्याचे समोर येत असून, नुकतीच मुक्ताई वार्ता ने घन कचरा उचलत नसल्याची बातमी प्रसिद्ध करताच आणि माजी नगरसेवक संतोष मराठे यांनी करार नामा पालिकेकडे मागताच सदरील कंत्राटदार व पालिका प्रशासन खाडकन जागे झाल्याचे नाटक करून नगरपंचायतीचे मिनी ट्रॅक्टर व ट्रॉली मध्ये क्षमते पेक्षा जास्त घन कचरा एकाच खेपेत वाहून नेण्याचा धक्कादायक प्रकार करीत असल्याचे यावरून दिसून आलेले असून दररोज जर प्रामाणिक पणे कामे केली असती तर आज अशी परिस्थीती उद्भवली नसती अशी सर्व सामान्य नागरिकात चर्चा असून पालिकेच्या वाहनावर परवाना धारक चालक बसत आहेत की नाही याचीही काळजी नगर पंचायत प्रशासनाने घेणे गरजेचे असून एकमेकांच्या अंगावर घोंगडे फेकण्यापेक्षा नागरिकांच्या सोयी सुविधेवर भर देवून सुरक्षेची देखील काळजी घेणे महत्त्वाचे आहे असे आजच्या घटनेवरून बोलले जात आहे.
——————————————
याप्रकरणी नगरपंचायतीचे लेखापाल श्रीपाद मोरे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की नगरपंचायतीने नगरपंचायतीची 10 वाहने मक्तेदार याला हस्तांतरित केलेली आहेत. त्यामुळे वाहनांची देखभाल दुरुस्ती व त्याची जबाबदारी मक्तेदार याची आहे. मक्तेदार याला घटना झाल्यानंतर नोटीस बजावलेली असून 27 जुलै रोजी नगरपंचायतीला बोलावण्यात आलेले असल्याचे लेखापाल श्रीपाद मोरे यांनी सांगितले.