देव आणि संतांशिवाय दुसरं कोणीही नाही जिवलग !
संत वांगमय व विचारांवर बोलतांना सारासार भान राखावे – ह.भ.प कैवल्य महाराज चातुर्मास्ये
मुक्ताईनगर : सद्गुरु विठोबादादामहाराज चातुर्मास्ये संस्थान, अनवा ह.भ. प कैवल्य महाराज चातुर्मास्ये यांची सहाव्या दिवसाची कीर्तन सेवा सोमवारी दि.२ जानेवारी २०२३ रोजी पार पडली. मुक्ताईनगर येथील तिर्थक्षेत्र संत मुक्ताई देवस्थान येथे श्री सद्गुरू धुंडा महाराज देगलूकर सेवा समिती,पंढरपूर व श्री संत मुक्ताई संस्थान ,मुक्ताईनगर समाधीस्थळ द्वारा आयोजित ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण – निरूपण व भव्य कीर्तन महोत्सवामध्ये ही सहाव्या दिवसाची एकादशी मुहूर्तावर जागर किर्तन सेवा मोठ्या उत्साहात पार पडली.
संता पायी माथा धरिता सद्भावे |
तेणे भेटे देव आपे आप ||
म्हणोनी संतांसी भजावे |
त्यांचे पायी लीन सदा ||
या भक्त शिरोमणी संत नामदेवरायांच्या संत महात्मपर अभंगाच्या माध्यमातून ह.भ. प कैवल्य महाराज चातुर्मास्ये यांनी मधुर अशा अमृततुल्य वाणीतून वाक पुष्पा द्वारे थोर अध्यात्मिक चिंतन मांडले.
पुढे चिंतन मांडताना त्यांनी वाक पुष्पातून सांगीतले की,

जीवनात आलेल्या प्रत्येक संकटांच उत्तर केवळ संत वांगमय आहे.केवळ परमार्थ च नव्हे प्रापंचिक आलेले संकटाच निदान संत वांगमयातच आहे. उदा. अचानक संकट आले तर ज्ञानेश्वरी ग्रंथ उघडावा आणि बघा ज्ञानेश्वर माऊली व संत तुकोबाराय यांच्या कृपेने निश्चित मार्ग मिळाल्याशिवाय राहणार नाही.गुरु शिष्य परंपरा ही परंपरेने संप्रदायाला दिलेली शिकवण आहे. तसेच संत वांगमयावर , प्रमाणावर बोळण्याकरीता ही अधिकार लागतो.हा अधिकार नसेल तर त्यावर बोलणं निरर्थक बडबड ठरते. संत महती केवळ संतच व परंपरेतील लोकच करू शकतात. त्यामुळे संत वांगमय व विचारांवर काय बोलावं आणि काय बोलू नये याचा सारासार विचार असावा.असे सांगत त्यांनी कीर्तन सेवेसाठी घेतलेल्या अभंगाच्या प्रत्येक चरणातून संत नामदेव राय जड जीवाला भक्तीचा मार्ग ईश्वर प्राप्ती कडे नेत असतो . त्यामुळे संत संगती करावी असा सल्ला देतात असे सांगितले.तसेच संतांची महती सांगताना संतांची भक्ती इतकी श्रेष्ठ होती की भगवंत त्यांच्या भाव व प्रेमाने इतका बांधला जातो की तो संतांच्या घरी संत भक्तीत तल्लीन असताना संतांच्या घरची कामे ही करतो. नव्हे नव्हे याची अनेक प्रमाणे संत चरित्रातून दिसून येत असल्याचे नमूद केले. व अनेक संत चरित्रपर दाखले दिले आणि मानवी जीवाला देव आणि संत यांच्याशिवाय दुसरं कोणीही जिवलग नाही.

त्यामुळे संतांच्या चरणी लीन होत संतांचे भजन, नाम स्मरण करावे जेणेकरून ईश्वराची प्राप्ती झाल्याशिवाय राहणार नाही असे चिंतनीय निरूपण त्यांनी कीर्तनाच्या माध्यमातून केले.
किर्तनाची सांगता झालेनंतर ह.भ. प कैवल्य महाराज चातुर्मास्ये यांचा संत मुक्ताबाई संस्थान चे अध्यक्ष ॲड.रवींद्र पाटील, चैतन्य महाराज देगलूरकर, संत मुक्ताई पालखी सोहळा प्रमुख रवींद्र हरणे महाराज यांनी सत्कार केला. तसेच सकाळचे नाश्ता, अन्नदाते , सायंकाळ चे अन्नदाते यांचाही शाल श्रीफळ व मुक्ताई ची प्रतिमा देवून सत्कार करण्यात आला.वेळी संत मुक्ताईचे विश्वस्त तसेच फडावरील सर्व किर्तनकार, टाळकरी फडकरी तसेच हजारो भाविक व श्रोते उपस्थित होते.
“श्री.संत निवृत्तीनाथ महाराज संस्थान, श्रीक्षेत्र त्र्यंबेकेश्वर जि. नाशिक या संस्थान च्या विश्वस्थ पदी नुकतीच ह.भ.प.माधवदास महाराज राठी नियुक्ती झाल्याची माहिती देत कीर्तन आटोपल्यावर ह.भ. प कैवल्य महाराज चातुर्मास्ये यांनी राठी महाराज यांचा सत्कार केला.”