तिर्थक्षेत्री कलश सप्ताह : २८ डिसेंबर ते ४ जानेवारी या काळात होणार आयोजन
मुक्ताई समाधिस्थळी ज्ञानेश्वरी पारायण अन् कीर्तन महोत्सव
मुक्ताईनगर
श्री सद्गुरु धुंडा महाराज देगलूरकर सेवा समिती पंढरपूर व श्री संत मुक्ताबाई संस्था मुक्ताईनगर समाधीस्थळ यांच्या संयुक्त विद्यमाने आदिशक्ती श्री संत मुक्ताबाई संस्थान जुने मंदिर समाधीस्थळी, ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण व निरूपण भव्य कीर्तन महोत्सव २८ डिसेंबर ते ४ जानेवारी या काळात आयोजित केला आहे.
श्री संत निवृत्ती महाराज, श्री संत ज्ञानेश्वर महाराज, श्री संत सोपान महाराज व आदिशक्ती मुक्ताई या चारही भावंडांना समाधीस्थ होऊन ७२५ वर्षे पूर्ण झालेली आहे. त्यानिमित्त फडकरी, गडकरी, संस्थानिकांनी सप्ताहाचे आयोजन केले आहे. चारही भावंडांचा सप्त शतकोत्तर रौप्य महोत्सवी सांगता समारोपीय कलश सप्ताह, श्री गुरु चैतन्य महाराज देगलूरकर यांच्या उपस्थितीत होणार आहे. कार्यक्रमाची सुरुवात सकाळी चार ते सहा वाजेपर्यंत काकड आरती, सकाळी सहा ते सात वाजेपर्यंत मुक्ताई स्रोत्र व अष्टके, सकाळी साडेसात ते अकरा श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण, सकाळी 11 ते साडेबारा गाथा भजन, दुपारी साडेबारा ते तीन भोजन व विश्रांती, दुपारी तीन ते पाच ज्ञानेश्वरी प्रवचन – यात प्रामुख्याने श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी निरूपण वाचावी ज्ञानेश्वरी प्रवक्ते म्हणून गुरु चैतन्य महाराज देगलूरकर हे आहेत. २८ रोजी रविंद्र महाराज हरणे (मुक्ताईनगर), २९ रोजी विठ्ठल महाराज वासकर (पंढरपूर), ३० रोजी भारत महाराज पाटील, ३१ रोजी माधवदास महाराज राठी ( त्रंबकेश्वर), १ जानेवारीला एकनाथ महाराज पुजारी (विठ्ठल मंदिर संस्थान बीड), २ जानेवारी रोजी कैवल्य महाराज श्री चातुर्मास (पंढरपूर), ३ जानेवारी रोजी प्रमोद महाराज जगताप (बारामती) यांची कीर्तने होतील. ४ जानेवारी रोजी सकाळी श्री चैतन्य महाराज देगलूरकर यांचे काल्याचे किर्तन होणार आहे. ३ रोजी रात्री आठ वाजता गायक पंडित प्रसन्न माधव गुढी (धारवाड, कर्नाटक) यांचा शास्त्रीय अभंगवाणीचा कार्यक्रम होणार आहे.
वारकरी भूषण पुरस्कार वितरण सोहळा
१ जानेवारीला वारकरी भूषण व मुक्ताई वारकरी रत्न पुरस्कार वितरण सोहळा होईल. चंद्रशेखर महाराज देगलूरकर, चैतन्य महाराज देगलूरकर, तुकाराम महाराज सखारामपूरकर यांच्याहस्ते पुरस्कारांचे वितरण होईल. प्रमुख पाहुणे म्हणून माजी महसूल मंत्री, विधान परिषद आमदार एकनाथ खडसे, आमदार चंद्रकांत पाटील, खासदार रक्षा खडसे, मुक्ताई संस्थानचे अध्यक्ष अॅड. रवींद्र पाटील यांची उपस्थिती लाभणार आहे.
प्रवचन, संध्याकाळी पाच ते सहा हरिपाठ, संध्याकाळी सहा ते आठ हरिकीर्तन, रात्री आठ नंतर भोजन अशी रूपरेषा महोत्सवाची असणार आहे. परिसरातील भाविकांनी तन मन धनाने सहकार्य करण्याचे आव्हान संस्थानतर्फे करण्यात आले आहे. तसेच सप्ताहाचा लाभ जास्तीत जास्त भाविकांनी घ्यावा, असे आवाहन श्री संत मुक्ताई संस्थानचे अध्यक्ष ॲड.रवींद्र पाटील, मुक्ताई फडावरील वारकरी भुषण कीर्तनकार, संत मुक्ताई पालखी सोहळा प्रमुख रवींद्र हरणे महाराज यांनी केले आहे.