खरे संत तेच ज्यांचा हेतू, भक्ती, भाव- विठ्ठल ! आणि अशा खऱ्या संतांचीच संगत धरा – ह.भ.प. एकनाथ महाराज पुजारी
मुक्ताईनगर : श्री.विठ्ठल मंदीर संस्थान, बीड ह.भ.प. एकनाथ महाराज पुजारी यांची पाचव्या दिवसाची कीर्तन सेवा रविवारी दि.१ जानेवारी २०२३ रोजी पार पडली. मुक्ताईनगर येथील तिर्थक्षेत्र संत मुक्ताई देवस्थान येथे श्री सद्गुरू धुंडा महाराज देगलूकर सेवा समिती,पंढरपूर व श्री संत मुक्ताई संस्थान ,मुक्ताईनगर समाधीस्थळ द्वारा आयोजित ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण – निरूपण व भव्य कीर्तन महोत्सवामध्ये ही पाचव्या दिवसाची किर्तन सेवा मोठ्या उत्साहात पार पडली. वारंवार होणाऱ्या विजेच्या लपंडावाणे मात्र चांगल्या कार्यक्रमात विघ्न आणल्याचे दिसून आले.
तेचि संत तेचि संत ।
ज्यांचा हेत विठठलीं ॥१॥
नेणती कांही टाणेटोणे ।
नामस्मरणें वांचुनी ॥२॥
काया वाचा आणि मनें ।
धाले चिंतने डुल्लती ॥३॥
निळा म्हणे विरक्त देहीं ।
आठवचि नाहीं विषयांचा ॥४॥
ज्यांचा हेत विठठलीं ॥१॥
नेणती कांही टाणेटोणे ।
नामस्मरणें वांचुनी ॥२॥
काया वाचा आणि मनें ।
धाले चिंतने डुल्लती ॥३॥
निळा म्हणे विरक्त देहीं ।
आठवचि नाहीं विषयांचा ॥४॥
या संत निळोबा रायांच्या चार चरणांच्या अभंगाच्या माध्यमातून ह.भ.प. एकनाथ महाराज पुजारी यांनी मधुर अशा वाणी तून वाक पुष्पा द्वारे अध्यात्मिक चिंतन मांडले.त्यांनी वाक पुष्पातून सांगीतले की ,
संत ओळखून त्यांचा हात धरुनच भवसागर पार होऊन मनुष्य खऱ्या अर्थाने मुक्ती मिळवू शकतो. नाहीतर जगामध्ये अनेक लोक भगवे कपडे घालून दिसतील त्यात असेलच असे नाही. संत चोखामेळा अभंगांमधून नमूद करतात,
ऊस डोंगा परी रस नोहे डोंगा ।
काय भुललासी वरलिया रंगा ।।
‘चोखा डोंगापरी भाव नोहे डोंगा’
या अभंगाच्या उक्तीप्रमाणे योग्य साधू संत यांची संगत घडणे ही आवश्यक तरच मनुष्य योग्य भक्ती प्राप्त करून मुक्ती मार्गाकडे जावू शकतो. असे कीर्तनातून निरूपण करतांना त्यांनी दिखाऊ अध्यात्मातली धोकेबाजी तुकोबारायांना जाणवली असावी; म्हणून त्यांनी ‘फक्त’ दिसण्याचा अध्यात्माशी संबंध नसतो हे समाजाला कळावं, समाज शहाणा व्हावा, यासाठी धर्माचे पालन lकरणे पाखंड खंडन।। म्हणत ‘फक्त’ दिखाऊ लोकांवर
वरी भगवा झाला नामेl
अंतरी वश केला कामेl
त्यासी म्हणू नये साधूl
जगी विटंबना बाधूll
असा स्पष्ट शेरा मारला. तर अध्यात्माचा संबंध अंतरंगाशी आहे हे सांगतांना मनाचा मवाळl वाचेचा रसाळl त्याच्या गळा माळl असो नसोll अशा प्रकारे दिखाऊ प्रवृत्ती व खरी आध्यात्मिकता यातला फरक आपल्या अभंगांतून समाजाला सांगितला. तरीही बहिरंग लक्षणे असणारा धार्मिक किंवा आध्यात्मिक साधक दांभिकच असेल, असेही नाही. पण अशी बहिरंग लक्षणे नसणारी आध्यात्मिक माणसेही आपल्या अवती-भवती असतात. ते आपल्या देहिक, मानसिक, आर्थिक परिस्थितीला व स्वाभाविक गुणांना आध्यात्मिक साधनेचे अधिष्ठान देतात.
संत हे वेदांचे रचयिते परमात्म्याप्रमाणे आहेत. कारण जसे परमात्मा प्राणिमात्रांच्या कल्याणकरीता वेदांची निर्मिती करतो.तसेच संतांनी सुद्धा प्राणिमात्रांच्या कल्याणकरीता अभंगांची निर्मिती केली. अभंग हे जिवाचं आत्यंतिक कल्याण करणारं साहित्य असून जशी वेदांच्या प्रत्येक रूचेला, शब्दाला, अक्षराला, वेलांटी, काना, मात्रा, उकार, अनुस्वार आदींना महत्व आहे. तसेच संत साहित्यातल्या प्रत्येक अभंग, ओवी ला यांनाही अनन्य साधारण महत्व आहे म्हणूनच संतांच्या या रचनेला अभंग म्हटलेलं आहे.असे चिंतनीय कीर्तन त्यांनी केले.
किर्तनाची सांगता झालेनंतर ह. भ. प. एकनाथ महाराज पुजारी यांचा संत मुक्ताबाई संस्थान चे अध्यक्ष ॲड.रवींद्र पाटील, चैतन्य महाराज देगलूरकर, संत मुक्ताई पालखी सोहळा प्रमुख रवींद्र हरणे महाराज यांनी सत्कार केला. तसेच सकाळचे नाश्ता, अन्नदाते , सायंकाळ चे अन्नदाते यांचाही शाल श्रीफळ व मुक्ताई ची प्रतिमा देवून सत्कार करण्यात आला.वेळी संत मुक्ताईचे विश्वस्त तसेच फडावरील सर्व किर्तनकार, टाळकरी फडकरी तसेच हजारो भाविक व श्रोते उपस्थित होते.